पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात असून राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यापीठाने गुरुवारी (दि.15) होणाऱ्या सर्व ऑनलाईन व ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी येऊ शकतात. तसेच अतिवृष्टीमुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; आज होणाऱ्या परीक्षा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 8:58 AM