पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या रकमेत ५० टक्क्याने कपात केली आहे. विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असताना Maha DBT मार्फतही शिष्यवृत्ती मिळते. ज्यांनी Maha DBT फॉर्म भरला आहे, त्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, अशी जाचक अट विद्यापीठाने घातली आहे.
मागच्या वर्षी अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या १२०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२,००० रू. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही रक्कम प्रत्येकी १८,००० रू. एकूण ८०० विद्यार्थ्यना छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात आली होती. यावर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (२०२०-२०२१) विद्यापीठाने ही रक्कम केवळ पदवीसाठी प्रत्येकी ६,००० रू. एकूण ४७० विदर्थ्यांना तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ही रक्कम ८००० रू. केवळ ३०० विद्यार्थ्यांना देण्यात येईल असे परिपत्रकात लिहिले आहे.
याबाबत पुणे शहर युक्रांदचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले, फक्त MahaDBT मार्फत मिळणारी शिष्यवृत्ती पुरेपूर नाही. कारण विविध भागांतून विद्यार्थीशिक्षण घेण्यासाठी येत असतात. बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती स्वतः खर्च करून शिक्षण घेण्याची नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्ती कमी करू नयेत. विद्यापीठ ज्या ठिकाणी खर्च करणे आवश्यक आहे तेथे खर्च न करता इतर ठिकाणी खर्च करतात. संशोधन भत्ता, शिष्यवृत्ती यांना फाटा देत विद्यापीठ गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार नाही अशाच योजनेची अंमलबजावणी करत आहे, हे यावरून दिसत आहे.
तसेच ज्यांनी Maha DBT फॉर्म भरला आहे त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही अशी जाचक अट घातली आहे, ही अट विद्यापीठाने तात्काळ मागे घेऊन शिष्यवृत्ती पूर्ववत ठेवावी अन्यथा विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांना रस्त्यावर उतरावे लागेल याची नोंद घ्यावी, असेही मत शेटे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.