पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि खाशाबा जाधव क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्यासाठी राज्य शासनातर्फे १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. येत्या जुलै महिन्यात पुरवणी अर्थ संकल्पात या निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोअर हॉल आणि अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातील कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेजमधील संग्रहालय, ग्रंथालय आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकासाठीसुद्धा सहकार्य केले जाईल.
पवार म्हणाले, आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता असून खेळाडूंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. खेळाडूंवर भार न टाकता क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी निधीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
उदय सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याचा देशपातळीवर लौकिक वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी १३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी उच्च शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. कारभारी काळे यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.
क्रीडा संकुलाच्या देखरेखीसाठी आवश्यक असणारा निधी उभा करण्यासाठी क्रीडा संकुल समितीतर्फे नियोजन केले जात आहे. क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी येत्या १५ दिवसांत विद्यापीठातर्फे धोरण ठरविले जाईल, असे विद्यापीठाच्या क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले.