पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या ११ एप्रिलपासून प्रथम सत्राच्या परीक्षा घेतली जाणार असून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुरुवारी रात्री उशिरा शारीरिक शिक्षण पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, विधी पदविका व पदवी अभ्यासक्रम तसेच शारीरिक शिक्षण आणि एमए जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच २५ एप्रिल रोजी विद्यापीठातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ११ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. शारीरिक शिक्षण पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ११ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत, विधी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते १७ एप्रिल दरम्यान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते २० एप्रिल आणि जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयांच्या परीक्षा १० ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक टप्प्या-टप्प्याने जाहीर केले जाणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.