पुणे : जगभर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाकडून मात्र इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. हिंदी विभागातील प्रवेशाच्या १२० पैकी ४४ जागा रिक्त राहिल्या असतानाही तिथे इतर विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आलेला आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेली जाहिरात व हिंदी विभागाचे जोडपत्र यामध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या एमए, एमएस्सी व एमकॉम आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या एमए प्रवेशाच्या जाहिरातीमध्ये मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, संस्कृत आणि एज्युकेशन आदी विषयांमध्ये एमए करायचे असेल तर आर्ट, कॉमर्स व सायन्स शाखेच्या कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार एमएसाठी वेगवेगळ्या शाखांच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.संबंधित विभागांमध्ये प्रवेश देताना मूळ विषयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र मूळ विषयाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी कमी आल्यास इतर विषयातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. हिंदी विभाग मात्र या नियमाला अपवाद ठरले आहे. केवळ हिंदी मूळ विषय असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी हिंदी विभागाच्या जाहिरातीचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र विद्यापीठाच्या जाहिरातीनुसार कोणत्याही शाखेच्या पदवीधराला प्रवेश घेता येईल, असे म्हणण्यात आले आहे. याबाबत हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले, ‘‘जाहिरात देताना हिंदी विभागातील प्रवेशासाठी मूळ विषय हिंदी असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे, त्यानुसार प्रवेशाची कार्यवाही केली जात आहे.’’आंतरविद्याशाखीय अभ्यास व संशोधन होण्याची आवश्यकता तज्ज्ञ अभ्यासकांकडून व्यक्त केली जात असताना केवळ हिंदी विभागाने इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करणे चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठ अनुुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांकडून प्रवेशाची कार्यवाही पार पाडली जाते. मात्र हिंदी विभागाने घेतलेली भूमिका ही त्याला छेद देणारी असल्याने कुलगुरूंकडे दाद मागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
हिंदी विभागाचे दरवाजे इतर विषयांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:51 AM