पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये यंदाच्या सत्रासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यंदाचा निकाल हा विद्यार्थ्यांना मिळालेले अंतर्गत (इंटर्नल) गुण आणि परीक्षेतील गुण हे दोन्ही एकत्र करून निकाल लावणार असल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
प्रचलित पद्धतीमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अंतर्गत गुण आणि परीक्षेतील गुण असे दोन वेगळ्या पद्धतीने गुणांकन करण्यात येते. यामध्ये विद्यार्थी अंतर्गत परीक्षा आणि असाइनमेंटमध्ये अनुत्तीर्ण झाला व तो लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही त्याला अनुत्तीर्ण केले जाते. मात्र, नवीन पद्धतीनुसार तसे न करता दोन्ही प्रकारचे गुणांकन करून एकत्रित निकाल लावण्याचा निर्णय शैक्षणिक परिषदेने घेतला आहे.
विद्यार्थ्यांना फायदा
नव्या गुणांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे. हा निर्णय केवळ या सत्रापुरता असला तरी अंतर्गत गुणांमुळे वर्ष वाया जाण्याचे प्रकार घडणार नाही. एकत्रित गुणांकन करताना विद्यार्थ्यांने अंतर्गत गुणांसाठीच्या परीक्षांना किंवा असाइनमेंटला मात्र हजर राहणे बंधनकारक राहणार आहे. एखादा विद्यार्थी तोंडी परीक्षा, असाइनमेंटला गैरहजर असेल, तर त्याला या सुविधेचा फायदा मिळणार नाही.
अंतर्गत गुण आणि परीक्षेचे गुण एकत्र करून निकाल लावण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. तसा निर्णय विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत घेतला आहे. विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षांसाठी उपस्थित असणे बंधनकारक आहे.
-संजीव सोनावणे, प्र-कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ