पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल: नियोजन नव्हते तर पूल पाडायची घाई का केली?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:17 AM2021-10-18T11:17:53+5:302021-10-18T11:29:01+5:30
दीड वर्ष होत आले वाहनचालकाबरोबर स्थानिकांनाही त्रास; आणखी किती वर्षे नरकयातना सहन करायच्या ?
-अभिजित कोळपे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर लगेचच नवीन दुमजली पुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. परंतु, दीड वर्ष होत आले तरी कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे मात्र, वाहनचालक, स्थानिक नागरिकांना नाहक नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नियोजनच केले नव्हते तर मग पूल पाडायची घाई का केली, असा संतप्त सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे.
कोरोना महामारीमुळे एप्रिल-मे २०२० या दरम्यान लॉकडाऊनमध्ये पूल पाडण्यात आला होता. हा उड्डाणपूल पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी पाडून तेथे एकाच खांबावर दुमजली पूल बांधायची घोषणा केली होती. दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी आणि वरून मेट्रो धावणार असे देखील जाहीर केले होते. लॉकडाऊन असल्याने वाहतूककोंडी होणार नाही. त्यासाठी तात्काळ पूल पाडायला सुरुवात केली. त्यानंतर पीएमआरडीएकडून पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, दीड वर्ष होत आले तरी काहीच हालचाली होत नाही. त्याठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड लावण्यात आले आहेत. त्यापुढे काहीच काम अद्याप झाले नाही.
भूमिपूजन होऊन तीन वर्षे झाली मेट्रोचे काम रेंगाळलेलेचडिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेवाडी येथे मेट्रोचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी ते म्हटले की पुढील तीन वर्षात मेट्रो पुणेकरांसाठी प्रत्यक्ष ट्रॅकवर महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि कात्रज ते निगडी मार्गावरील या दोन मेट्रोबरोबर धावेल. सध्या महामेट्रोच्या या दोन मार्गांचे जवळपास ७० टक्के काम होऊनही तांत्रिक (ट्रायल रन) चाचणी घेण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोसाठी पीएमआरडीए किंवा केंद्र, राज्य सरकार एकही रुपया टाकणार नाही. तर टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या भागीदारीत ८ हजार ३०० कोटी रुपये स्वतः खर्च करून मेट्रोचे काम करणार आहे. मात्र, तीन वर्षे होऊन गेली तरी अद्याप मेट्रोचा एकही खांब उभा राहिला नाही. बाणेर-बालेवाडी परिसरातील रस्त्यावर फक्त बॅरिकेड लावण्यात आले आहेत. याबाबत पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे दीड वर्ष गेले. त्यानंतर मेट्रो यार्ड, कार शेडची जागेचे भूसंपादन करणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्याच्या परवानग्या मिळवण्यासाठी लागले आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होईल.
प्रशासन नेमकं करतंय काय ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठ चौकातील पूल पाडून तेथे लगेच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, या पुलाचा आराखडा अजून तयार झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. दीड वर्षात जर प्रशासन आराखडाही तयार करत नसेल तर मग प्रशासन नक्की काय काम करत आहे, असा सवाल उपस्थित होतो. उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारायला हवा. पीएमआरडीए जर हा पूल मेट्रो बरोबर बांधणार असेल तर हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर अद्याप एकही खांब उभारलेल्या नाही. आता जरी काम सुरू केले तरी पुढे तीन वर्षे लागणार आहे. मग विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करायची आहे, असा प्रश्न शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीधर गलांडे यांनी उपस्थित केला आहे.
रोज दोन-तीन किलोमीटरची कोंडी नित्याचीच
औंध, बाणेर आणि पाषाणकडून येणाऱ्या वाहनचालकांना रोज दोन-तीन किलोमीटर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या बाजुने येणाऱ्या वाहनांना सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी पूर्वी तंत्र शिक्षण महाविद्यालय चौकातून वळून जाता येत होते. आता बॅरिकेड लावून हा चौक बंध केल्याने दोन किलोमीटर खाली येऊन कृषी महाविद्यालय (म्हसोबा गेट) चौकातून वाहनचालकांना वळून जावे लागत आहे. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या बाबींची दखल घ्यायला हवी.
- प्रमोद देवकर-पाटील, अध्यक्ष, कर्तव्य जनमंच