पुणे : अाॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट अशी ख्याती असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत पारंपरिक विद्यापिठांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला अाहे. इतर विद्यापिठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. विद्यापिठामध्ये करण्यात येणारं संशाेधन, अभ्यासक्रम, साेयीसुविधा यांच्या अाधारे हे मानांकण देण्यात अाले अाहे. विद्यापिठाच्या या यशाबद्दल विद्यापिठातील विद्यार्थ्यांना काय वाटते ते अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला अाहे.
इंग्रजीमध्ये एम. फिल करणारा अमाेल सरवदे म्हणाला, विद्यापिठाचा पारंपारिक विद्यापिठांमध्ये प्रथम क्रमांक अाला असला तरी विद्यापिठात विद्यार्थ्यांसाठी अधिक साेयीसुविधा उपलब्ध हाेणे अावश्यक अाहे. सध्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतीगृहे विद्यापिठात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल हाेत अाहेत. खासकरुन विद्यार्थींनींना वसतिगृह न मिळाल्यास नातेवाईकांकडे किंवा बाहेर खाेली घेऊन रहावे लागते. यात त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण हाेताे. संशाेधनात मात्र विद्यापिठाने चांगली प्रगती केली अाहे. विद्यार्थ्यांच्या समस्या साेडविल्यास विद्यापिठाच्या संयुक्त क्रमवारीत अाणखी सुधारणा हाेऊ शकते.
पाॅलिटीकल सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला असणारी रुक्साना शेख म्हणाली, राज्यातील तसेच देशातील अन्य पारंपारिक विद्यापिठांच्या तुलनेत पुणे विद्यापिठाचा दर्जा खूप चांगला अाहे. शिक्षणाच्या बाबतीत विद्यापीठ चांगली कामगिरी करत अाहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने इतर गाेष्टींवर सुद्धा लक्ष द्यायला हवे. विद्यापिठातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अनेक असुविधा अाहेत. याबाबत अाम्ही अनेकवेळा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला अाहे. परंतु विद्यापिठाकडून फारसे लक्ष देण्यात अाले नाही. त्याचबराेबर विद्यापिठातील विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीन टाकण्यासाठीची कुठलिही साेय करण्यात अालेली नाही. त्यामुळे विद्यार्थीनींना अडचणींचा सामाना करावा लागताे. प्रवेश प्रक्रीयेमध्ये पारदर्शकता येणे अावश्यक अाहे. वसतिगृहांची संख्या सुद्धा वाढवायला हवी.
पारंपारिक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापिठाने पहिला क्रमांक मिळवला याचा अानंद अाहे. परंतु अनेक गाेष्टींवर विद्यापिठाने भर देणे अावश्यक अाहे. खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या साेयी, वसतीगृह निर्माण करायला हवीत. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विविध साेयी उपलब्ध करुन द्यायला हव्यात. असे मत विद्यापिठातून डी टी डी मध्ये डिप्लाेमा करणाऱ्या सरस्वती विरकर हिने व्यक्त केले. तर बायाेकेमिस्ट्रीमध्ये एम फील करणारा नितीन कदम म्हणताे, इतर विद्यापिठांच्या तुलनेत पुणे विद्यापिठात चांगले अाणि दर्जेदार शिक्षण मिळते. संसाेधनाला विद्यापिठाकडून जास्तीत जास्त प्राेत्साहन दिले जाते. दर महिन्याला विज्ञान फेस्टिवल भरविण्यात येते त्याचबराेबर विविध तज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी अामंत्रित केले जाते. विद्यापिठाचे शिक्षकही उत्तम शिकवतात. विद्यापिठात अनेक संशाेधन केंद्र सुद्धा अाहेत.