पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेतील नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचने बाजी मारली. यात महाविकास आघाडीप्रणित सावित्रीबाई परिवर्तन पॅॅनलचा अक्षरश: धुव्वा उडविला. रात्री पावणेदहापर्यंत आठ जागांचा निकाल जाहीर झाला. त्या आठही जागांवर विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी विजय मिळविला.
या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले परिवर्तन पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा यांनीही आपले पॅनल या निवडणुकीसाठी मैदानात उभे केले होते. याचा निकाल मंगळवारी लागला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.
विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबद्ध पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
विजयी उमेदवारांची नावे :
(अनुसूचित जाती) - राहुल पाखरे (१३,५१२) वि.वि. संदीप शिंदे (४,८३६), अनुसुचित जमाती- गणपत नांगरे (१३,९३५) वि.वि. विश्वनाथ पाडवी (५,०८२), भटक्या जमाती - विजय सोनववणे (१४,१०१) वि.वि. अजिंक्य पालकर (५,०७०), महिला - बागेश्री मंठाळकर (१५,६४९) वि. वि. तब्बसुम इनामदार (६,३५३), खुला - सागर वैद्य, खुला - प्रेसणजीत फडणवीस, खुला - युवराज नलवडे.