पुणे : स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर झालेला करार मोडून महापालिका आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबरोबर (बार्टी) करार करणार आहे. विद्यापीठात जाणे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाºया पुणे शहरातील होतकरू, गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी ही योजना महापालिका गेली काही वर्षे समाजविकास विभागाच्या माध्यमातून राबवत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १०० व खुल्या विद्यार्थ्यांसाठी ५० अशा एकूण १५० विद्यार्थ्यांना यात प्रवेश देण्यात येते. महापालिका पुणे विद्यापीठाला त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे १७ हजार रुपये वार्षिक असे अनुदान देते. महापालिका अंदाजपत्रकात यासाठी स्वतंत्र तरतूद दरवर्षी करत असते. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला असून परीक्षा उत्तीर्ण होऊन ते सरकारी सेवेत अधिकारी म्हणून काम करत आहेत. खासगी संस्थाचालक अशाच मार्गदर्शनासाठी हजारो रुपये शुल्क घेत असतात. गरीब विद्यार्थ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठात कायम असे वर्ग चाललेले असतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांना तिथे पाठवण्यात येत होते. निवडीसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. विद्यापीठाच्या सहकार्यानेच ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो. पुणे शहरात तीन वर्षांपासून जास्त काळ वास्तव्य अशी अट त्यासाठी आहे. दोन्ही गटांत मिळून साधारण ७० ते ७५ विद्यार्थी दरवर्षी असतात.>महाविद्यालयांमधून वाटली जाणार पत्रकेमहापालिकेने विद्यापीठाबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. तो लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यानंतर या योजनेसाठी बार्टीबरोबर करार करण्यात येईल. बार्टीलाही प्रत्येक विद्यार्थ्यामागे अनुदान दिले जाणार आहे. त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली. महापालिकेत वरिष्ठ स्तरावर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.पुणे विद्यापीठात जाणे-येणे यातच बराच वेळ जात असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी महापालिकेकडे केली होती.त्यामुळेच आता हे प्रशिक्षण बार्टीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली. बार्टीचे कार्यालय शहरात मध्यवर्ती ठिकाणी व पुणे विद्यापीठापेक्षा जवळ आहे.विद्यापीठातील मार्गदर्शन व बार्टीमधून केले जाणारे प्रशिक्षण यात काही प्रमाणात फरकही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदाच होईल, असे समाजविकास विभागातून सांगण्यात आले.
महापालिका मोडणार पुणे विद्यापीठाचा करार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबरोबर करणार करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:59 AM