पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. यावर मात करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने १३० प्राध्यापकांची ५ सप्टेंबरपर्यंत भरती केली जाणार आहे. विद्यापीठाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर भरण्यात आलेल्या १४० प्राध्यापक पदांपैकी रिक्त असलेल्या जागाही भरल्या जाणार आहेत.
यामुळे विद्यापीठाला आता २०० हून अधिक प्राध्यापक मिळण्याची शक्यता आहे. अनेक विभाग प्राध्यापकांअभावी सुरळीत पद्धतीने चालवता येत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून विद्यापीठाकडून कंत्राटी पद्धतीने काही प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या वेतनाचा खर्च विद्यापीठ फंडातून केला जात आहे. असे असले तरी अजूनही विद्यापीठाला जवळपास २०० हून अधिक प्राध्यापकांची गरज आहे.
यापुढे आता आणखी १३० प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय विद्यापीठाकडून अर्थसाहाय्य करून भरण्यात येणारे कायमस्वरूपी प्राध्यापकही नेमले जातील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाचा दर्जा काहीसा घसरला होता. या रॅंकिंगमध्येही विद्यापीठात प्राध्यापकांची कमतरता असल्याने विद्यापीठावर ठपका ठेवण्यात आला होता. भविष्यात असे घडू नये आणि एनआयआरएफमधील विद्यापीठाची श्रेणी सुधारावी, यासाठी आता कंत्राटी पद्धत आणि स्वयंअर्थसहाय्यित पद्धतीने प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
प्राध्यापक भरतीसाठी योजना तयार केली असून, ५ सप्टेंबरपर्यंत १३० प्राध्यापकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल. याशिवाय उर्वरित प्राध्यापकांच्या १४० जागाही भरण्यात आल्या होत्या. त्यातील रिक्त जागांची माहिती घेऊन त्यांच्या जागीही प्राध्यापक नेमले जातील.
- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ