पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 113 वा पदवी प्रदान समारंभ येत्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता अायाेजित करण्यात अाला अाहे. या कार्यक्रमासाठी विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहेत. कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार अाहेत. या समारंभात एकूण 11 जणांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार अाहेत.
विद्यापीठ अनुदान अायाेगाच्या सूचनांप्रमाणे वर्षातून दाेनदा पदवी प्रदान साेहळा अायाेजित केला जाताे. वर्ष 2016-17 मध्ये अणि त्याअाधी उत्तीर्ण पदवी अाणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण 7,242 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार अाहेत. यामध्ये पीएचडी पदवी 104, एम.फिल. 54, पदव्युत्तर पदवी 3006, पदव्युत्तर पदविका 63, पदवी 3994 अाणि पदविका प्राप्त 21 जणांना पदवी प्रदान करण्यात येणार अाहे.
दरम्यान, सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमापूर्नवी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या जाणार अाहेत. या पदव्या प्रशासन भवनाजवळील नव्याने बांधण्यात अालेल्या परीक्षा भवन येथे दिल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अशाेक चव्हाण यांनी दिली.