पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) 'राष्ट्रध्वज धारण करणाऱ्या लोकांच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन फोटो अल्बम'साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवण्याची मोहीम सोमवार १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत यशस्वी झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गिनीज न्यायाधीशांनुसार, वरील रेकॉर्डचे अंतिम मोजमाप १ लाख ५२ हजार ५५९ फोटो म्हणून घोषित करण्यात आले.
या विश्वविक्रमी नोंदीची आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित समारंभात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे न्यायाधीश ऋषी नाथ यांनी घोषणा केली. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांशी संबंधित लोकच नव्हे तर देशभरातील आणि जगभरातील लोकांनीही या विद्यापीठाच्या मोहिमेत सहभागी होऊन एक अनोखा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (७५ व्या वर्धापन दिनानिमित्त) 'स्वराज्य महोत्सव' आणि 'हर घर तिरंगा' कार्यक्रमांतर्गत विद्यापीठातर्फे 'युवा संकल्प अभियान' आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेची सुरुवात मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती आणि सोमवारी १५ तारखेला हा नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित यशस्वीरित्या संपन्न झाला.
हे जाहीर करताना ऋषी नाथ म्हणाले की “या विक्रमी प्रयत्नाचा निकाल देताना अत्यंत आनंद झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारताचे नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बेंचमार्क तयार केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांच्या प्रयत्न आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक करतो.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा विश्वविक्रम प्रस्थापित करत या अमृतमहोत्सवी वर्षात अमृताचा वर्षाव झाला आहे असे मी मानतो. कोणत्याही देशात त्यांच्या देशातील युवकांमधील ही प्रेरणा त्यांच्या देशाची ताकद असते. भारत देशाकडे जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य आहे, ते या युवकांमुळेच आहे.
यावेळी राजेश पांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कायमच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाने तीन वर्षात दोनदा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागतिक विश्वविक्रम केला आहे. मात्र हे केवळ विश्वविक्रम म्हणून नाही तर राष्ट्रीय कर्तव्याप्रती केलेला हा संकल्प असल्याचे यावेळी राजेश पांडे यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरी डॉ. कारभारी काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव हे भारतातच नव्हे तर जगात अग्रेसर आहे. या ऐतिहासिक विद्यापीठाने अनेक विक्रम केले आहेत, पुढील काळातही अश्याच प्रकारे शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती होईल. या विश्वविक्रमाच्या माध्यामतून युवकांना प्रेरणा मिळून भक्कम राष्ट्रनिर्मिती होईल.
पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले, पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कोरोना असो, पुर असो किंवा अन्य शैक्षणिक बाब असो या विद्यापीठाने कायमच लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. या युवकांच्या प्रेरणेतून भारताला जगाचे नेतृत्व करण्याचे बळ मिळत आहे.