पुणे : कुत्रा पाळणे हा आता समाजात फॅशन होऊ लागली आहे. परदेशी जातीच्या कुत्र्यांना तर चांगलाच भाव मिळू लागला आहे. यामुळे अशा कुत्र्यांची आता मोठ्या प्रमाणात चोरीही होऊ लागली आहे. टिंबर मार्केटमधून बुधवारी दुपारी एक 60 हजार रुपयांचे कुत्र्याचे पिल्लू चोरीला गेले असून खडक पोलीस शोध घेत आहेत. धैर्यशील शिवाजीराव पाटील (वय 36 वर्ष) यांनी त्यांचा पाळीव कुत्रा चोरीला गेल्याची तक्रार केली होती. जॅक रसेल टेरिअर या जातीचे त्यांच्याकडे तीन महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू होते. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते भवानी पेठेतील टिंबर मार्केटमधील पवन टिंबर येथे आले होते. ते फर्निचरच्या दुकानात गेले असताना दुचाकीवरुन एक पुरुष व महिला आली. ही महिला गाडीवरुन उतरली आणि कोणाचे लक्ष नाही हे पाहून कुत्र्याचे पिल्लू उचलले व ते दोघंही जण पसार झाले.
कुत्र्याचं पिल्लू चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी खडक पोलिसांकडे धाव घेतली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, उपनिरीक्षक बी. सी. गावीत यांनी घटनास्थळाला भेट दिली. हे कुत्र्याचे पिल्लू पांढ-या रंगाचे असून ते तीन महिन्यांचे आहे. त्याच्या मागील बाजूस शेपटीजवळ गोल आकारात काळ्या रंगाचे केस असून डोक्याचा रंग काळा आहे. या पिल्लाचे वर्णन पोलिसांनी सर्व ठिकाणी पाठवले असून त्याचा शोध घेतला जात आहे.