Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा ; दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा 'अशा'प्रकारे राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:22 PM2021-06-11T19:22:20+5:302021-06-11T19:33:21+5:30
पुणे शहर हे नवीन नियमावली मध्ये दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. या संबंधीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे
पुणे : राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबत पाच टप्पे तयार करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांमध्ये बदल होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, आता पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर आल्याने पुणे शहराला दिलासा मिळाला आहे.
पुणे शहर हे नवीन नियमावली मध्ये दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. या संबंधीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. येेेत्या सोमवार (दि.१४) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागच्या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबाबत वेगळे धोरण स्वीकारले जाणार असल्याची घोषणा पवार यांनी केली होती. त्याच धर्तीवर पुण्यात अनलॉक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.१६ टक्के इतका असल्यामुळे पुणे शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आणि या टप्प्यातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनाचा संसर्ग राज्यात सारखा नाही. त्याची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, टप्पे सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याकरिता निर्बंधांच्या ५ टप्पे ठरविण्यात आले आहेत. हे टप्पे निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैंनदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात आले आहे.
अशी आहे नवीन नियमावली...
*दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७
* हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० (पार्सल रात्री ११ पर्यंत)
* अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद
* संचारबंदी रात्री १० पासून
* उद्याने सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७
* Outdoor स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ , संध्याकाळी ५ ते ७
* अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत
* राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी
* लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक
* शासकीय कार्यलये १०० टक्के क्षमतेने सूूरु
* खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू