पुणे : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘वसंतोत्सव’ला शुक्रवार (दि. १७) पासून सुरुवात होत असून, रविवार (दि. १९)पर्यंत चालणार आहे. कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे महोत्सव होणार असल्याची माहिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी कळविली आहे. वसंतोत्सवचे हे १८ वर्ष असून, तीनही दिवस सायं. ५:३० ते रात्री १०:००दरम्यान महोत्सव होईल.शास्त्रीय गायन, तालवाद्य, लाइट म्युझिक, लाइव्ह बँड याबरोबर बहारदार गझल्स अशा एकाहून एक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी वसंतोत्सवातून रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत, असे राहुल देशपांडे यांनी आवर्जून सांगितले. याची सुरुवात शुक्रवारी ‘अग्नि’ या सुप्रसिद्ध रॉक बँडच्या बहारदार सादरीकरणाने होईल. अग्नि बँड हा आपल्या ‘कबीरा...’, ‘शाम तन्हा...’, ‘साधो रे...’ अशा नावाजलेल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात केरळमधील प्रसिद्ध ‘थायक्कुडम ब्रिज’ या बँडचे सादरीकरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शनिवारी (दि. १८) रंजनी आणि गायत्री या बहिणींच्या एकत्रित सादरीकरणाने होईल. यावेळी रंजनी या कर्नाटक शैलीत आपले गायन सादर करतील, तर गायत्री या कर्नाटक संगीताच्या अंगाने व्हायोलिन वादन प्रस्तुत करतील. यानंतर मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन होईल. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची (१९ जानेवारी) सुरुवात राहुल देशपांडे यांच्या गायनाने होईल. यानंतर पद्मश्री पुरस्कार विजेते हरिहरन यांचे बहारदार गायन होईल.
Pune vasantotsav : सूर निरागस हो..! ‘वसंतोत्सव’ला उद्यापासून सुरुवात
By श्रीकिशन काळे | Updated: January 16, 2025 17:01 IST