पुणे : मांत्रिकाच्या मदतीने महिलेवर उपचार करणा-या डॉ. सतीश चव्हाणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील हा धक्कादायक प्रकार होता. अलंकार पोलिसात डॉ. सतीश चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यासाठी डॉक्टरनेच मांत्रिक बोलावल्याची धक्कादायक घटना येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडली. संबंधित महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनीच एका व्हिडीओद्वारे हा प्रकार समोर आणला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत होता. या प्रकाराबद्दल रात्री उशिरा डॉ. सतीश चव्हाण आणि उपचारासाठी बोलावलेल्या मांत्रिकावर अंधश्रद्धाविरोधी कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संध्या सोनवणे (वय 24 वर्ष) यांच्यावर स्वारगेट येथील डॉ. सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये स्तनाच्या गाठीवर उपचार सुरू होते. त्यांना 20 फेब्रुवारीला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे डॉ. चव्हाणसुद्धा तपासणीसाठी येत असत. संध्या यांची तब्येत बिघडत चालल्याने डॉ. चव्हाण यांनी मांत्रिकाला बोलावून त्याच्यामार्फत उताराही केला.
हा सर्व प्रकार संध्या यांच्या नातेवाइकांनी कॅमे-यात चित्रित केला. संध्या यांचे बंधू महेश जगताप यांनी सांगितले की, डॉ. चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मांत्रिकाला बोलावले़ त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला. जगताप यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉक्टरांकडून पोलीस संरक्षणाची मागणीधमकीचे फोन येत असल्याचे सांगून डॉ़ चव्हाण यांनी पोलिसांकडे सरंक्षणाची मागणी केली आहे. मात्र, आपण संध्या यांना तपासत असताना एक पुजारी हजर होता, असे त्यांनी कबूल केले. ‘व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वा मंत्र-तंत्राचा प्रकार आढळला नाही. हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाला प्रवेश दिला जात नाही. नातेवाईक म्हणून रुग्णाला भेटायला कुणीही जाऊ शकतो. - डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ हॉस्पिटल