पुणे / प्रतिनिधी / किरण शिंदे: बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात सोमवारी 'बघतोय रिक्षावाला' या संघटनेच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. सोमवारी मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर एकत्र येत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांनी शिंदे यांना 'फेकू अधिकारी' म्हणत साष्टांग दंडवत घातला.
शहरात सुरू असणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारला होता. वारंवार सांगूनही, निवेदन देऊनही आरटीओ अधिकारी रिक्षा चालकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान रिक्षा चालक आणि आरटीओ यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला होता. बघतो रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर, काही रिक्षा चालक आणि आरटीओचे अधिकारी यांच्यात रिक्षा चालकांच्या मागण्यावर चर्चा सुरू होती.
चर्चेदरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात कारवाई केली जाईल, यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमले जातील, कारवाईसाठी आवश्यक असणारे सहकार्य पोलिसांनाही केले जाईल असे सांगितले. दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून हेच आश्वासन देणाऱ्या अजित शिंदे यांच्या या आश्वासनानंतर मात्र रिक्षा चालक संतप्त झाले.
"तुमच्या प्रत्येक वेळीच्या या फेकू गिरीला, बोलबच्चन गिरीला आम्ही कंटाळलो आहोत. मागील वेळेसही तुम्ही हेच आश्वासन आम्हाला दिले होते परंतु ते पाळले नाही. तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला, तुमच्यासारख्या फेकू अधिकाऱ्यांसह प्रशासनाचा धिक्कार करतो" असे म्हणत रिक्षा चालकांनी आरटीओ अजित शिंदे यांना साष्टांग दंडवत घातला.. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
दरम्यान, पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आलेला रिक्षा चालकांचा संप सोमवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असल्याचे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी यावेळी गितले. त्यानंतर रिक्षा चालकांनी आपला संप मागे घेतला. मात्र येत्या दहा दिवसात बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशाराही यावेळी रिक्षा संघटनांनी दिला आहे.