पुणे :मतदान केंद्रांवर मतदारांसोबत मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये रोष पहायला मिळाला. मतदान करताना अनेकांना सेल्फी काढायचा असतो, परंतु, मतदान केंद्रावर या वेळी मोबाईल घेऊन जाऊ नये, अशी सक्त ताकीद पोलीसांकडून देण्यात येत होती. परिणामी मतदारांनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला.आजकाल मोबाईलमध्ये फोटो काढण्याचे फॅड सर्वांना लागले आहे. मतदान केल्यानंतरचा फोटो प्रत्येकाला स्टेटसवर ठेवायचा असतो, शेअर करायचा असतो, त्यामुळे अनेकजण मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर गेले. पण केंद्राबाहेर पोलीसांनी मोबाईल घेऊन जाण्यास मनाई केली. अनेक ठिकाणी तर वाद देखील झाले.
मोठ-मोठ्या नेत्यांना आतमध्ये मोबाईलवर फोटो काढू दिले जातात, सेलिब्रेटीला परवानगी असते, मग सामान्य नागरिकांनाच का नाही ? असा सवाल करून अनेकांनी पोलीसांशी हुज्जत घातली. कसब्यातील बहुतांश ठिकाणी मोबाईलवरून वाद झाले. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण पहायला मिळाले.