पुणे : गेल्या लोकसभेला पुणे शहरात सर्वात कमी मतदान झाले होते. त्यामुळे या वेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनासह विविध मंडळे, संस्थांनी उपक्रम राबविले आहेत. सकाळी मतदान करा आणि चहापान, नाश्ता करा, असा उपक्रम कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये राबविण्यात आला. दरम्यान, पुणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक मतदान कसबा पेठ मतदारसंघातच झाल्याचे पहायला मिळाले. कसब्यात दुपारी १ पर्यंत ३१ टक्के मतदान झाले.यंदाची निवडणूक वेगळ्या प्रकारची असून, जाती-पातीचे, मुलभूत सुविधांचे प्रश्न उभे ठाकलेले आहेत. त्यामध्ये मतदार नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. कसब्यात आज (दि.२०) सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. बहुतांश पेठेतील भागात मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिक देखील रिक्षाने येऊन मतदान करत होते. अनेकांना हाताला धरून मतदान केंद्रावर घेऊन जावे लागत होते. त्यांच्यामध्ये मतदानाचा उत्साह प्रचंड होता. ‘वय झाले म्हणून काय झाले, मतदान करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडणारच !’ अशा प्रतिक्रिया बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या. मतदानाची जागृती झाल्याने कदाचित सकाळपासूनच कसब्यात मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले.ग्राहक पेठेमध्ये मतदान केल्यानंतर बोटावरील शाई बघून चहापान दिले जात होते. तर कसबा गणपतीसमोर चहा आणि क्रीम रोलची सोय केली होती. सकाळी ७ ते १० दरम्यान ज्यांनी मतदान केले, त्यांनाच कसबा गणपतीसमोर ही सोय होती. अनेक मंडळांनी नाश्त्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आज मतदार राजाच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
Pune Vidhan Sabha Election 2024 : पुण्यात मतदान वाढावे म्हणून चहापान, नाश्त्याची सोय..!
By श्रीकिशन काळे | Published: November 20, 2024 2:00 PM