पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून पहिल्या चार तासांमध्ये जिल्ह्यात १५.६४ टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या पहिल्या चार तासांमध्ये जिल्ह्यात २२ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र बंद पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर ११ हजार ४२१ मतदान यंत्र बसविण्यात आली असून बंद पडलेल्या मतदान यंत्रांचे प्रमाण केवळ ०.१३ टक्के आहे. राखीव मतदान यंत्र मधून ही यंत्रे तातडीने बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे. मतदान यंत्रांसह १६ कंट्रोल युनिट व २८ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले होते. ते देखील बदलण्यात आले आहेत.जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात कसबा मतदारसंघात तर पहिल्या चार तासात बारामती मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात २२ मतदान यंत्र बंद पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्यात सर्वाधिक ४ मतदान यंत्रे वडगाव शेरी व इंदापूर मतदार संघात बंद पडली होती. तर हडपसर, भोसरी, भोर, दौंड व चिंचवड या मतदारसंघात प्रत्येकी ३ मतदान यंत्र बंद पडली होती. जुन्नर, खेड आळंदी, मावळ व कसबा पेठ मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान यंत्र बंद पडले. ही सर्व यंत्रे राखीव असलेल्या यंत्रांमधून बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. यासह जिल्ह्यात १६ कंट्रोल युनिट व २८ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडली होती.