पुणे: पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकांची सांगता अजूनही झाली नसून २६ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही मिरवणुका सुरु असल्याचे दिसून आले आहे. अनंत चतुर्दशीला सकाळी १० वाजता मानाच्या गणपतीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या मंडळांनी वेळेत यंदा बाप्पाला निरोप दिला. मात्र त्यानंतर सुरु झालेली मंडळांची मिरवणूक अजूनही संपली नाही.
पुण्यात लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या प्रमुख रस्त्यांवरून जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जातो. लक्ष्मी रस्त्यावरून मानाचे आणि प्रतिष्ठित मंडळे जातात. त्यामागोमाग इतर मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. तर इतर तीन रस्त्यानी सुद्धा बाप्पांच्या मिरवणुका सुरु असतात. रात्री १२ नंतर स्पीकरला बंदी असल्याने केळकर, टिळक रस्त्यावर मंडळे ६ तास मिरवणुका थांबवतात. व सकाळी ६ वाजता स्पीकर लावून सुरुवात केली जाते. त्यामुळे दरवर्षी २५ ते ३० तास मिरवणुकींचा उत्साह सुरु असतो.
यंदाही २६ तास होऊनही बाप्पाला मंडळांकडून निरोप दिला जात आहे. लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. पुण्यातील मिरवणूक संपण्यासाठी अजून एक ते दीड तास लागण्याची शक्यता असल्याचे दिसू लागले आहे. पुण्यातील अलका चौकातून आतापर्यंत 117 मिरवणुका गेल्या आहेत. मागील वर्षी जवळपास 28 तास मिरवणूक चालली होती. यावर्षी मिरवणूक कधी संपते या कडे लक्ष लागलं आहे. यावेळी देखील मिरवणुका उशिरापर्यंत चालतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस मिरवणुका लवकर संपवाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत.