पुणे : उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची घटना दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांविरोधातील ही घटना अत्यंत खेदजनक आहे. पुणे व्यापारी महासंघ पूर्णत: या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे. (mahavikas aghadi) महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघ सहभागी आहे. सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका (fattechand ranka) यांनी सांगितले.
''शहरातील व्यापारी लॉकडाऊनच्या फेऱ्यातून आता कुठे बाहेर येत आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता कुठे सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यास हातभार लागत आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडे अनेक लोक काम करत आहेत. त्यांचे संसार चालले पाहिजे. त्यासाठी दुकाने सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र, (lakhimpur) लखीमपुरची घटना दुर्दैवी आहे. शेतकऱी आपली लढाई शांततेत लढत आहेत. त्यांच्याबरोबर हिंसाचाराची जी घटना घडली आहे. ती अत्यंत खेदजनक असल्याचे रांका म्हणाले.''
बंदच्या हाकेला सुमारे ९५ टक्के व्यापाऱ्यांनी संमती दर्शवली
''आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापारी हा कोणत्याही पक्षाचा नाही. मात्र, लॉकडाऊनमध्ये आमचे खूप नुकसान झाले आहे. पुन्हा दुकाने सुरू करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले आहे. मात्र, लखीमपूरची घटनेचे समर्थन करता येत नाही. त्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर शिवसेनेचे प्रशांत बधे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विनंती केली. त्यांच्या मागणीला सुमारे ९५ टक्के व्यापाऱ्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवतील. त्यांनंतर दुकाने उघडण्यास सहमती दर्शवली आहे असेही रांका यांनी यावेळी सांगितलं आहे.