पुणे : पावसाचा जोर बघून भावाला मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं होतं पण त्याने ते ऐकलं नाही आणि मला दिसला तो त्याचा मृतदेहचं...एक -दोन नाही तर तब्बल १५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं.
ते म्हणाले, 'आम्ही सगळे बिहार मधल्या काठीया जिल्ह्याचे. आमच्याकडे गावातले सगळेजण एकेका गटाने कामासाठी बाहेर पडतात. आमच्या गटात आम्ही आणि शेजारच्या गावातील लोक होते. आम्ही ३५ जण गेल्या अडीच महिन्यापासून इथे काम करतो. पण या कामाचा शेवट 'असा' होईल असं चुकूनही वाटलं नव्हतं.
पुढे ते म्हणाले, 'मी रात्री भावाला पावसाचा जोर बघून म्हटलं तू माझ्याच खोलीत झोप. पण त्याने ते ऐकलं नाही आणि अपघातानंतर त्याचा मेंदू बाहेर आलेल्या रूपातलं अंतिम दर्शनच मला झालं. आमच्या पत्र्याच्या खोल्यांवर पावसाचा मोठा आवाज होत असल्याने मला रात्री जाग आली होती. पण पुन्हा प्रयत्न करून एकाच्या सुमारास मी झोपलो आणि जोरात आवाज झाला. तो आवाज इतका मोठा होता की मला वाटलं सगळी बिल्डिंग माझ्या अंगावर कोसळली. डोळे उघडून बघतो तर माझ्या कंबरेखालचा भाग मातीखाली होता आणि पत्रे तुटून मी झाडाच्या खाली होतो. आजूबाजूला काहीवेळ बचाव-बचाव आवाज येत होते. पण काही वेळात ते क्षीण झाले आणि दुर्दैवाने मी एकटाच आजचा सूर्य बघू शकलो.
एक मोठा उसासा टाकून ते म्हणाले, 'गेलेले सारे माझे नातेवाईक होते. कोणी मावस तर कोणी मामेभाऊ, कोणी भाचे तर कोणी पुतणे. ज्यांच्यासोबत पुण्यात आलो तिथून जाताना आता त्यांचे मृतदेह घेऊन जायचे आहेत. कोणाला काय सांगू आणि घरच्यांना काय उत्तरं देऊ काहीच कळत नाही. आता डोळ्यासमोर अंधार आहे, आयुष्यातल्या सर्वात वाईट आठवणींनी भरलेला आजचा दिवस वाटत आहे.
ती किलबील कायमची थांबली
या अपघातात चार लहान मुलांनाही जीव गमवावा लागला आहे.त्यांची आठवण काढताना विमल म्हणाले, ' ती मुले आमचं काम सुरु असताना आजूबाजूला खेळत असत. त्यांचा तो किलबिलाट कानात साठून राहिलाय. अजूनही हाक मारतात असा भास होतो. आता तो किलबिलाट थांबलाय. अगदी कायमचाच...'