पुणे : विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
बिबवेवाडी परिसरात संध्याकाळपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
बिबवेवाडी परिसरात संध्याकाळपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नागरिकांची दैना उडाली. तसेच आकाशात जोरदार होणाऱ्या विजेच्या कडकडाटामुळे देखील परिसर दणाणून गेला होता. बिबवेवाडी परिसरात संध्याकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे काही तुरळक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.
हडपसरमध्ये पावसामुळे नोकदारांची दैना
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज, सायंकाळी सातनंतर दमदार पावसाने दिलासा दिला. आज उकाडा जाणवत होता. सायंकाळी अचानक आकाशामध्ये ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांची चांगलीच दैना झाली. सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक, रवीदर्शन, मांजरी फाटा, पंधरा नंबर, तसेच हडपसर-सासवड रस्त्यावर तुकाई दर्शन चौक, भेकराईनगर आगारासमोर सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीचालकांची तारांबळ उडाली. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे काही दुचाकीस्वारांना अपघात झाला. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. फुरसुंगी परिसरातील तुकाई दर्शन, भेकराई नगर परिसरात ड्रेनेज लहान असल्याने पाणी रस्त्यावर वाहत जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
वाघोली परिसरात जोरदार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल
परिसरास अचानकपणे प्रमाणावर पाऊस आल्याने सर्वच चाकरमान्यांना चांगलीच धावपळ उडाली. तर वाघोली परिसरात जोरदारपणे पडलेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी होते. केसनंद रोडचे काम चालू असल्याने अनेक वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी आणि रस्ता चिखलमय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे पुणे नगर रस्त्यावरदेखील वाहतूक कोंडी झाली होती. विजांच्या लखलखाट आणि कडकडाटामुळे पाऊस जोरदार कोसळत असल्याने वाघोली परिसराचा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला होता. एक तास झालेल्या जोरदार पावसामुळे चाकरमान्यांचे खूप हाल झाल्याचे पाहायला मिळत होते. तर अनेकांच्या दुचाकी रस्त्यावर बंद पडल्याचे दिसून येत होत्या.
सुतारवाडी येथे काही मिनिटांतच साचले गुडघाभर पाणी
सुतारवाडी स्मशानभूमीजवळ केवळ थोड्याच वेळेच्या जोरदार पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. पालिकेने केलेल्या पावसाळी गटाराच्या स्वच्छता कामाची देखील पोलखोल झाली. साखरेला पाण्यामध्ये दुचाकी बंद पडत होत्या, तर स्मशानभूमीकडे जाणारा रस्तादेखील बंद होता. गुडघाभर असलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत होती. अवघे पाच ते दहा मिनिटांत पडलेल्या पावसामध्येही परिस्थिती उद्भवली.
मुंढवा-केशवनगरमध्ये जोरदार पाऊस
मुंढवा-केशवनगर-घोरपडी परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर हलक्या सरी येतच होत्या. नंतर मात्र मुसळधार स्वरूपात पाऊस सुरू झाला. येथील परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाळी तळे निर्माण झाले. यामुळे दुचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुपारपासूनच ढग दाटून आले आणि काही क्षणांत जोरदार पावसाच्या सरी सुरू झाल्या. केशवनगर, मुंढवा, घोरपडी, पिंगळेवस्ती, कोरेगाव पार्क परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. परिणामी परिसरातील वाहतूक संथगतीने सुरू होती. काही ठिकाणी तर रस्त्यात पावसाळी पाण्याचे तळे साचले होते. यातूनच मार्ग काढताना दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागली.