पुणे : शहरात दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले़ शहराच्या वेगवेगळ्या भागात २० ठिकाणी जोरदार वाºयामुळे झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली होती़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत २२.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २ दिवसांपासून शहरात उकाडा वाढला होता़ त्यामुळे सायंकाळी अचानक ढगांनी आकाश गर्दी केली आणि सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारात जोरदार पाऊस कोसळू लागला़ काही वेळातच रस्त्यांवरुन पाण्याचे लोंढे वाहू लागले़ जोरदार वाऱ्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडपडीच्या २० घटना घडल्या़ स्वारगेट, आपटे रोड, शिवदर्शन येथे फुटपाथवरील झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने येथील रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला़ अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु केले.
स्वारगेट ते गोळीबार मैदान दरम्यानच्या रस्त्यावर दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने या रस्त्यावर उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती़ गेल्या तीन महिन्यात शहरात अनेकदा जोरदार पाऊस झाला़ पण लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रसंग आले नव्हते़ आज मात्र तासाभराच्या पावसाने अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी रस्त्यांवर साचलेले दिसत होते़ त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसली. पुणे शहरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहरातील शिवाजीनगर येथे रात्री साडेआठ वाजेपर्यंत २२़१ मिमी पाऊस पडला़ आशय मेझरमेंटसनुसार सायंकाळी ६ ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत कात्रज येथे २८.८ मिमी, धायरी -सिंहगड रोड भागात ३९.२ मिमी, वारजे येथे २१ मिमी आणि कोथरुड येथे १५.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.