पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. उन्हाचे चटके बसायला लागले असताना पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मागणी वाढल्याने टाकीत पूर्ण दाबाची पातळी येण्याआधीच पाणीपुरवठा सुरू करावा लागत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या सुरुवातीच्या भागात जास्त पाणी उपलब्ध होत आहे. जलवाहिनीचा शेवटचा भाग, उंचावरील भागात पाणी पोहोचण्यास उशीर होत आहे आणि त्या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता, पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ यासह अन्य पेठा या भागात पाणीपुरवठा कमी होत आहे. एरंडवणे, पटवर्धन बाग, नळ स्टॉल यासह अन्य परिसरात पूर्वी पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत होता.
पण, गेल्या आठवड्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच वेळेआधीच अर्धा ते पाऊण तास पाणी जात आहे. सोसायट्यांच्या टाक्या भरत नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सेनापती बापट रस्ता, वडारवाडी, जनवाडी, मॉलेड कॉलनी या परिसरातील आहे. पाण्याला पुरेशा दाब नसल्याने पूर्ण वेळ पाणी असले तरीही टाक्या भरत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.