सहकारनगर : पुण्यात आलेल्या पालखीच्या दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या रिक्षावर झाड पडले आणि पालखीच्या दर्शनाआधीच तिचा अंत झाला. ही घटना मुक्तांगण शाळेजवळ आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
लीलाबाई विश्वनाथ काकडे (वय ६३, रा. श्रीकृपा सृष्टी हौसिंग सोसायटी, दत्तनगर, जांभूळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नम्रता सचिन पोळ (वय ४६), कमल अडिकामे (वय ६९), मीना पुरुषोत्तम पोळ (वय ६१) असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या रिक्षात आणखी एक तीन वर्षांचे बालकही होते. सुदैवाने ते सुखरूप आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लीलाबाई काकडे या पालखीच्या दर्शनासाठी एका रिक्षातून निघाल्या होत्या. त्यांच्यासमवेत रिक्षामध्ये आणखी तीन महिला व एक लहान मुलगाही होता. त्यांची रिक्षा दत्तनगर येथील मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तारेच्या कुंपणाजवळ येऊन इतर प्रवाशांसाठी थांबली होती. त्याचवेळी कुंपणातील एका भल्यामोठ्या झाडाची फांदी रिक्षावर पडली. त्यामुळे रिक्षातील तीनही महिला जखमी झाल्या. रिक्षाचे टप फाटून फांदी रिक्षात घुसल्याने जखमी महिलांना रिक्षाच्या बाहेर पडता येणे शक्य नव्हते. स्थानिक नागरिक मदतीला धावले व त्यांनी सर्व जखमींना रिक्षाच्या बाहेर काढले. काहींनी तातडीने अग्निशमन दलाला कळविल्यानंतर रेस्क्यू टीम तत्काळ दाखल झाली. त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र दरम्यान रस्त्यातच लीलाबाई काकडे यांचे निधन झाले.
अग्निशमन अधिकारी रवींद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल, संदीप घडशी आणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भूषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी या रेस्क्यू कामगिरीत सहभाग घेतला. घटनेची नोंद पोलिसात झाली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे करत आहेत.