पुणे : दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड या राज्यांतील नद्यांना पूर आला आणि सर्व जनजीवन विस्कळीत झाले. हीच स्थिती पुणे शहरावर येणार आहे. कारण मुठा नदीकाठी झाडं काढून तिथेच बांधकाम केले जात आहे. परिणामी पाणी शहरात घुसेल. नदी सुधार प्रकल्प बंद केला नाही तर भविष्यात पुण्याची दिल्ली झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. तरीही महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सुशाेभीकरणात दंग असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने देशातील नद्यांचा सुधार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. त्यात पुण्यातील मुठा नदीचाही समावेश आहे. नदी पुनरुज्जीवनासाठी जवळपास ५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. नदीकाठी बांधकाम केले तर पाण्याने जायचे कुठे, हा प्रश्न आहे. योग्य जागा मिळाली नाही तर पुण्याची अवस्था दिल्लीसारखी व्हायला वेळ लागणार नाही. त्याचा ट्रेलरदेखील पुणेकरांनी चांगलाच अनुभवला आहे.
तासाभराच्या पावसाने पूरस्थिती :
काही महिन्यांपूर्वीच डेक्कनला केवळ तासाभराच्या पावसाने पूरस्थिती आली होती. पावसाने पंधरा दिवस संततधार लावली तर पुण्याचे काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा. या गोष्टींचा अभ्यास करूनच मुठा नदी बचावासाठी जीवित नदी आणि इतर पुणेकर नदीकाठ सुधारला विरोध करत आहेत. महापालिका मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. दिल्लीतील अवस्था पाहून वास्तुविशारद सारंग यादवाडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे याविषयी पत्र पाठविले आहे. नदीकाठ सुधार प्रकल्प करू नये आणि त्यावर चर्चा तरी करावी, असे आवाहन त्यांनी आयुक्तांना केले आहे.
सिमेंटीकरण केल्यास पाणी जाणार कुठे?
दिल्लीमधील स्टॉर्म वॉटर यंत्रणा पावसासमोर काहीच करू शकत नाही. तशी अवस्था पुण्याचीही होऊ शकते. यापूर्वी एका पावसात डेक्कन परिसरात पुराची स्थिती आली होती. तो केवळ एक ट्रेलर होता, तरी देखील महापालिका जागी झालेली नाही. दिल्लीत यमुनेला पूर आला आणि तीच अवस्था पुण्यातील मुठा नदीची होणार आहे. कारण नदीकाठ सुधारमध्ये सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणावर होऊन पाण्याला जागाच मिळणार नाही. नदीकाठ हा जैवविविधता संपन्न असतो, तिथे नैसर्गिकपणे पुराचे पाणी जिरत असते. ती यंत्रणाच नष्ट करून तिथे सिमेंटीकरण केले जात आहे.
नैसर्गिकपणे पुनरुज्जीवनाची मागणी
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना याविषयी वास्तुविशारद व पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी पत्र दिले आहे. त्यात ते म्हणतात की, हवामान बदलाचे परिणाम ही आता केवळ कल्पना नसून, एक भयंकर वैश्विक सत्य आहे. पुण्यातही आपण ढगफुटी आणि पुरांचे प्रमाण वाढल्याचे अनुवभत आहेत. खरं तर अनेक कारणांमुळे पुणे हे अत्यंत पूरप्रवण महानगर बनले आहे. यासंदर्भात मी आपले लक्ष पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांकडे वेधू इच्छितो. या प्रकल्पाला विरोध होत असताना तो रेटला जात आहे, हा प्रकल्प त्वरित थांबवावा आणि नदीचे नैसर्गिकपणे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी यादवाडकर यांनी केली आहे. नागरिकांच्या हितासाठी खुल्या मंचावर आयुक्तांनी येऊन चर्चा करावी, अशी विनंती करणारे पत्रही त्यांनी आयुक्तांना दिले आहे.
एकीकडे आश्वासन, दुसरीकडे ठेंगा
महापालिका आयुक्तांनी नदीकाठी सिमेंटीकरण होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु, सध्या बंडगार्डन येथील नदीकाठी सिमेंटीकरण करण्यात येत आहे. यावरून आयुक्त सरळ सरळ खोटं बोलून हा प्रकल्प रेटत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप नदीप्रेमींनी केला आहे.
या घटना काय सांगतात?
१) २५ सप्टेंबर २०१९ :
बाणेरमध्ये या वर्षी नदीला पूर आलेला. यावेळी राम नदीच्या काठी असलेल्या कपिल मल्हार सोसायटीत पाणी शिरले होते. तिथेच एक खासगी हॉस्पिटल आहे. त्याचे दोन मजले पाण्याखाली गेले होते. तर इमारतीभोवती पाणी साचल्याने एका शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी अडकले होते.
२) २५ सप्टेंबर २०१९ :
कात्रज परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्यावेळी रात्रीत घरांमध्ये पाणी शिरले आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात जनावरे व घरांमधील सामानही वाहून गेले होते. टांगेवाले कॉलनीतील सहा जणांचा मृत्यू झाला होता.
३) १२ सप्टेंबर २०२२ :
औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात सप्टेंबर २०२२ मध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पाणी साचल्याने रस्त्यांना नदी, नाल्यांचे स्वरूप आले होते. पाषाण परिसरात काही ठिकाणी घरांत पाणी गेले होते. पाषाण-सूस रस्ता, सुतारवाडी स्मशानभूमीजवळ, एनडीए रोड, पाषाण, विठ्ठलनगर व लोंढे वस्ती परिसरात घरांमध्ये पाणी गेले होते. राम नदीला पूर आल्यामुळे परिसरातील सोमेश्वरवाडी येथील सोमेश्वर मंदिरातील पिंड पाण्याखाली गेली होती.
४) १४ ऑक्टोबर २०२२ :
शिवाजीनगर परिसरात या दिवशी दुपारनंतर तब्बल ७४.३ मिमी पाऊस झाला होता. कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने ड्रेनेजलाइन तुंबल्या होत्या. डेक्कनमध्ये प्रचंड पाणी साठले आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. साधारणपणे दिवसभरात पडणारा पाऊस अवघ्या दोन तासांत पडल्याने शिवाजीनगरच्या काही भागांत रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहनेही वाहून गेली हाेती.
पाण्याला त्याची नैसर्गिक जागा दिली नाही की काय होते, ते दिल्लीत यमुना नदी दाखवून देते आहे. इतिहासातले तिचे पात्र आज तिने तब्बल ३५ वर्षांनंतर पुन्हा व्यापले आहे. आज जागतिक तापमानवाढीने अशा अतिवृष्टीच्या घटनांची शक्यता वाढली आहे. कदाचित आणखी दशकभरात अशा घटना दर दोन-पाच वर्षांनी घडू लागतील. जे दिल्लीत घडतंय ते भारतीय उपखंडातल्या इतर कोणत्याही शहरात घडू शकतं. पुण्यासारख्या पाच-पाच नद्यांच्या सान्निध्यातल्या शहराने तर हा विषय अधिक गांभीर्याने घ्यायला हवा. पानशेतच्या पुराच्या थरारक कथा आपण आजीआजोबा आणि आईवडिलांकडून ऐकत आलो आहोत. पुढच्या पिढ्यांनी अशा कहाण्या आपल्याकडून ऐकाव्या अशी कुणाचीच इच्छा नसावी. सामान्य नागरिक तर आपल्या रोजच्या जगण्याच्या विवंचनांमध्ये अडकलेले असतात, मात्र शहराचा कारभार चालवणाऱ्यांनी या धोक्याकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य आहे.
- प्रियदर्शनी कर्वे, पर्यावरणतज्ज्ञ