पुणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार लॉकडाऊनचे अस्त्र काढणार की नव्याने निर्बंध आणणार यामुळे आजच्या आढावा बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वच पुणेकरांचे लक्ष होते.पण अजित पवारांनी तूर्तास लॉकडाऊनचा निर्णय न घेता पुणेकरांना दिलासा दिला आहे. मात्र याचवेळी त्यांनी पुणे शहर रात्री 10 वाजता बंद करण्याची सूचना देखील दिली आहे.
अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शुक्रवारी (दि.१२) कोरोना आढावा बैठक होत आहे.यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पवार नेमके कुठले पाऊल उचलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापौर हे उपस्थित आहे. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेतल्याची माहिती आहे.
पवार यांनी या बैठकीत शाळा आणि कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळाली आहे. तसेच शहरातील उद्याने संध्याकाळी बंद राहणार आहे. लग्न समारंभ, धार्मिक सोहळे इतर कार्यक्रमांना ५० उपस्थिती बंधनकारक असणार आहे. शहरातील मॉल आणि चित्रपटगृहे रात्री दहापर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठा, दुकाने यांना रात्री 10 पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे.
तसेच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी असणार आहे. परंतू, अत्यावश्यक सेवेतील वाहने, कर्मचारी यांना परवानगी असणार आहे. तसंच रात्री १० नंतर एका तासांकरिता हॉटेल,रेस्टोरंट यांना होम डिलिव्हरीची परवानगी दिली आहे. याचवेळी लग्न समारंभ, धार्मिक विधी, सामाजिक व सार्वजनिक सोहळे, अंत्यविधी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर मॉल,, चित्रपटगृह रात्री १० नंतर बंद असतील. कोचिंग क्लाेस आणि ग्रंथालये ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. लवकरच शहरातील निर्बंधांबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.