पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पावधी सरकारच्या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात चांगलेच 'होर्डिंग वॉर' रंगले होते. या 'होर्डिंग्ज बाजी'मधून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची जोरदार हवा केली होती. मात्र, आता या होर्डिंग युद्धात शिवसेनेने उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवस २७ जुलै रोजी आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात 'होर्डिंग वॉर' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले असून प्रमुख नेत्यांचे पुणे दौरे, बैठका, भेटीगाठी वाढल्या आहे. तसेच निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २२ जुलैला आहे. या निमित्ताने भाजपकडून फडणवीसांचा 'विकासपुरुष व पुण्याचे विकासाचे शिल्पकार' म्हणून उल्लेख करत शहरात महत्वाच्या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांचा 'लयभारी कारभारी' म्हणून होर्डिंगबाजी केली होती. या निमित्ताने शहरात भाजप आणि राष्ट्रवादीत रंगलेल्या 'होर्डिंग वॉर'ची चांगलीच चर्चा पुण्यात रंगली होती. मात्र, आता या युद्धात शिवसेनेनं उडी घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी( दि. २७) वाढदिवस आहे. याचेच औचित्य साधत शिवसेनेकडून होर्डिंगबाजी केली आहे. यावेळी 'पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार' असा उल्लेख करण्यात आला आहे. या होर्डिंग्जमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी शिवसेनेने साधल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या होर्डिंगबाजीनंतर पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुण्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीसच 'कारभारी' आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा पुण्यात चालणार असल्याचा निष्कर्ष भारतीय जनता पक्षाच्या एका सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधून पुण्यात फडणवीस यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र, भाजपामध्ये कार्यकर्त्यांत संभ्रम असून खासदार गिरीष बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील की आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याच दिवशी अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने पुण्यातील फडणवीस-पवार होर्डींग वॉरची चर्चा चांगलीच रंगली आहे.
गेल्या महापालिका निवडणुकांत पराभव झाला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार यांची ताकद आहे. आता राज्यात सत्ता असल्याने ही ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे अजित पवारांविरुध्द लढण्यासाठी पुण्यात फडणवीस यांचा चेहरा उपयुक्त ठरेल, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या वेळी फडणवीस यांनी आपण नाशिकचे पालकत्व स्वीकारले आहे. या शहराचा चेहरा-मोहरा मी बदलून टाकेन असे आश्वासन दिले होते. त्यावेळी नाशिकमध्ये भाजपची सत्ता आली होती. हाच प्रयोग पुण्यातही भाजप करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे फडणवीस यांचा सर्वात जंगी वाढदिवस पुण्यातच साजरा करण्यात आला.