पुणे : कालवा समितीच्या बैठकीत शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यापासून पुणेकरांकडून त्याची प्रतीक्षा करण्यात येत होती. अखेर प्रशासनाकडून दोन वेळा पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली असून, बुधवारपासून दररोज दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. कालवा समितीच्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत पुणे शहराला दररोज दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सोमवारपासून (दि. ९ जानेवारी) पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे निर्देश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले होते. मात्र, पाणीपुरवठा विभागातील अनेक कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या आणि निवडणुकांचे काम यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला उशीर लागला. अखेर दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून, येत्या बुधवार (दि. ११ जानेवारी)पासून त्याची कार्यवाही केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.यंदा शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यामुळे पुणेकरांना पूर्वीप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी दिले, अशी मागणी स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. नगर परिषदा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसहिंतेमुळे पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. एकीकडे कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जात असताना, पुणेकरांना पिण्यासाठी वाढीव कोटा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. (प्रतिनिधी)
पुणेकरांना उद्यापासून दोन वेळा मिळणार पाणी
By admin | Published: January 10, 2017 3:59 AM