पुणे: पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. तसेच लसीकरणात पुणे शहर पुढे आहे. पण कोरोना निर्बंध अजून तसेच आहेत. निर्बंधांवर सूट मिळावी अशी व्यापारी वर्गाची मागणी आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील निर्बंधात काहीच बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
''मागील दोन आठवड्यापासून जे कोरोनाबाबत जे नियम लावण्यात आले आहेत. तेच पुढे चालू राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत.'' आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
पवार म्हणाले, आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार यावेळेत सकाळी ७ ते दुपारी ४ चा नियम सुरूच राहील. शनिवार रविवार मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व पूर्णपणे बंदच राहील. सोमवार पासून काहीही बदल होणार नाही. पुण्याच्या पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यापेक्षा जास्त असल्याने ते लेव्हल ३ वरच राहिल असेही ते म्हणाले आहेत.
जुलै महिन्यात लसीकरणात अजून वाढ होणार
महाराष्ट्रचा कोरोना बरे होण्याची टक्केवारी ९६.३१ टक्के आहे. तर पुणे जिल्ह्याचा कोरोना बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के झाली आहे. पुणे शहरात लसीकरणही जोरात चालू असून महाराष्ट्रात पुणे अव्वल स्थानावर असल्याचं ते म्हणाले आहेत. ग्रामीण भागाने लसीकरणाचा २० लाख टप्पा पार केला आहे. जुलै महिन्यात लसीकरणात अजून वाढ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.