पुणे : थंडीचा कडाका पुन्हा एकदा सुरू झाला असून, पुण्यात सोमवारी (दि.१६) शिवाजीनगर ७.८ अंशावर तर एनडीए ६.१ अंशावर होते. त्यामुळे पुणेकर एकदम गारठून गेले. पहाटे घराबाहेर पडल्यानंतर हाताचा बर्फ झाला की, काय अशीच अवस्था अनुभवायला मिळाली.सध्या राज्यभर थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यात पुण्यातही थंडीने पुणेकरांना गारठून टाकले आहे. किमान तापमानात सोमवारी (दि.१६) प्रचंड घट झाली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद आज झाली. गेल्या काही दिवसांत शहरातील हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहे. दिवाळीमध्ये पुणेकरांना थंडीची जाणीव झाली नाही. थंडी गायब झाल्याचे तेव्हा बोलले गेले. पण त्यानंतर मात्र थंडीला सुरवात झाली. काही दिवस थंडी पडली आणि पुन्हा गायब झाली. आता पुन्हा तापमानाचा पारा घसरला आहे.राज्यामध्ये सातत्याने दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट होत आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), शिवाजीनगर, शिरूर, माळीण, दौंड, बारामती या काही ठिकाणी किमान तापमान एक आकडी नोंदवले गेले. पुण्यामध्ये ६ ते ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिवसादेखील हुडहुडी भरेल, एवढा गारवा वातावरणात आहे. हवामान विभागानूसार सोमवारी (दि.१६) एनडीए येथे सर्वांत कमी ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगर येथे ७.८, शिरूर ६.२, माळिण ७.३, दौंड ७.३, बारामती ७.३, तळेगाव ८.३, राजगुरूनगर ८.५, इंदापूर ९.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पुण्यातील किमान तापमानएनडीए : ६.१शिरूर : ६.२माळिण : ७.३दौंड : ७.३बारामती : ७.३शिवाजीनगर : ७.८तळेगाव : ८.३आंबेगाव : ८.५पुरंदर : ९.३इंदापूर : ९.७नारायणगाव : १०.०लवासा : ११.९कोरेगाव पार्क : १३.१वडगावशेरी : १४.५लोणावळा : १५.१मगरपट्टा : १५.५
पुण्यासह राज्यभरात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी आज सोमवारी एक आकडी तापमानाची नोंद झाली. ही थंडी आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज आहे. -माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे