पुणे: सॅनफ्रान्सिस्को ते पुणे अशा प्रवासादरम्यान दोन बॅगांमधील सुमारे दीड लाख रुपयांचे सामानाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एअर फ्रान्स कंपनीमधील कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी येरवडा येथील त्रिदलनगरमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला २९ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक वेळेनुसार साडेतीन वाजता सॅनफ्रान्सिको ते पुणे या विमानाने प्रवास करणार होत्या. त्यानुसार, त्यांनी सॅनफ्रान्सिको विमानतळावर चेकइन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या दोन बॅगा विमानतळावरील एअर फ्रान्स या विमान कंपनी कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिल्या. त्या पॅरीसमार्गे मुंबईला परतल्या.
मात्र विमानाबराेबर त्यांच्या बॅगा न आल्याने मुंबई विमानतळावर त्यांना त्यांच्या बॅगा मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी बॅगांचा क्लेम करुन पुण्यातील घराचा पत्ता दिला. त्यानंतर दोन दिवसांनी ३ ऑक्टोबरला विमान कंपनीने त्यांच्या बॅगा घरी पाठविल्या. त्यांनी बॅगा उघडून पाहिल्या असता त्यात कपडे, गिफ्ट आयटम्स, चॉकलेट, परफ्युम, हॅन्डबॅग, पर्सेस खेळणी असा १ लाख ४० हजार ३६७ रुपयांचे सामान गायब झाले होते.
त्यांनी कंपनीकडे याबाबत चौकशी केली. परंतु, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एअर फ्रान्स कंपनीच्या कोणत्या तरी कर्मचाऱ्याने या वस्तूंचा अपहार केला, म्हणून त्यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव तपास करीत आहेत.