पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी जात असलेल्या पुणे युनिटच्या महिला पोलीस अधिका-याला पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांवर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकारी संजय लोणे, आनंद , प्रदीप देशमुख, आणि कर्मचारी पांडुरंग रणदिवे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस व पंच असे शासकीय गोपनीय कामासाठी आळेफाटा येथे जात असताना जुन्नर येथील मौजे चाळकवाडी टोलनाक्याच्या बुथवर त्यांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून शासकीय कामासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र बुथवरील कर्मचा-याने पोलिसांचे ओळखपत्र चालत नाही असे सांगितले. शासकीय कामासाठी चाललो असल्याचे सांगूनही कर्मचा-याने अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
अधिका-यांनी टोलनाक्यावरील कर्मचा-यास व्यवस्थित बोलण्यास आणि वागण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावरून त्यांच्यात झटापट झाली. पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. शासकीय कामामध्ये अडथळा आणून महिला पोलीस अधिका-यास अश्लिल व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करून हल्ला केल्याप्रकरणी टोलनाक्यावरील अधिकारी आणि कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.