पुणे: स्वारगेट बसस्थानकात बुधवारी पहाटे तरुणीवर बलात्कार झाल्याने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील स्वारगेट, छत्रपती शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तीनही ठिकाणी मिळून ४८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ४६ सुरक्षारक्षक असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी, मौल्यवान ऐवज चोरणे या घटना वारंवार घडत आहेत. आता तरुणीवर बलात्कार झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीचा व सुरक्षारक्षकांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
पुण्यातील तीनही बसस्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. शिवाय राज्य सरकारकडून सवलत दिल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच बसस्थानकावर ४८ सीसीटीव्ही आणि ४६ सुरक्षारक्षक तैनात असूनही बलात्कारसारखी घटना घडल्यामुळे हे सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बसस्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाइल, मौल्यवान ऐवज चोरणे असे प्रकार घडत आहेत. पण, त्यावेळी या सीसीटीव्हीचा व सुरक्षारक्षकाचा काहीही उपयोग झालेला नाही. कारण, यातील जवळपास निम्मे सीसीटीव्ही बंद अथवा अस्पष्ट दिसतात. तर, सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी केबिनमध्ये झोपतात, अशी अवस्था आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे चित्र आहे. स्वारगेट बसस्थानकातून दिवसाला ४० ते ५० हजार नागरिक प्रवास करतात. तर, शिवाजीनगर बसस्थानक हे राज्यातील सर्वात मोठे आगार आहे. येथून देखील ४० ते ५० हजारांच्या आसपास नागरिक प्रवास करतात. या ठिकाणाहून राज्याच्या काेनाकोपऱ्यात बस धावतात. तसेच, पुणे स्टेशन येथून मुंबई व राज्यातील काही शहरांसाठी बस धावतात. ही तीनही बसस्थानके पुणे विभागातील महत्त्वाची आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात एसटी प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मोबाइल, पाकीट चोरी अन् लूटमारी
राज्य सरकारच्या सवलतीमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे बसस्थानकावरील प्रवाशांना टार्गेट करत आहेत. यामुळे मोबाइल, पाकीट चोरीचे वाढले आहेत. तसेच, काही वेळा मौल्यवान ऐवजदेखील चोरीला गेला आहे. शिवाय प्रवाशांना गुंगीचे औषध असलेला पदार्थ देऊन लूटमारदेखील केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, बसस्थानकावर उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. आता तर स्वारगेट बसस्थानक येथे तरुणीवर बलात्काराची घटना घडली आहे. यामुळे एसटी प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खरंच गंभीर आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे.
केवळ ४८ सीसीटीव्ही, ४६ सुरक्षारक्षक
दररोज वर्दळ आणि गर्दीच्या असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात केवळ २२ सुरक्षारक्षक तैनात आहेत. तर, छत्रपती शिवाजीनगर येथे १७ आणि पुणे स्टेशनवर ७ सात सुरक्षारक्षक तैनात आहेत. परंतु, प्रवासी संख्या, एसटीची बस वर्दळ पाहता या ठिकणी सुरक्षेच्या दृष्टीने दुप्पट संख्या वाढविणे गरजेचे आहे. शिवाय तीनही बसस्थानकांत केवळ ४८ सीसीटीव्ही आहेत. परंतु, बसस्थानकांचा परिसर पाहता सीसीटीव्हींची संख्यादेखील वाढविण्याची गरज आहे. शिवाय एवढे सुरक्षारक्षक असताना बलात्कारसारखी घटना घडते तर सुरक्षारक्षक काय करतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वारगेट, छत्रपती शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तीनही बसस्थानकांत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात असतात. तसेच, सर्व बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. -प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग