पुणे : महापालिकेच्या मालकीचा विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक तुटून ठेकेदाराकडील कामगाराच्या डोक्यात पडला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी घडली. पांडुरंग म्हस्के (३५, रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
म्हस्के हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. पुणे महापालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नाना पेठ येथे डोके तालीमजवळ जुना विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. हे काम ठेकेदारामार्फत सुरू होते.
हे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा पुढील भाग पाठीमागे घेताना हूक तुटला. तेथे उपस्थित ठेकेदाराकडील कर्मचारी पांडुरंग म्हस्के या इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात ताे पडला. म्हस्के यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रेन जप्त केली असून, याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षय गोरड हे तपास करीत आहेत.
विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक तुटून ठेकेदाराच्या कामगाराच्या डोक्यात पडला. त्यात कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापुढे असा अपघात होऊ नये यासाठी ठेकेदारांना क्रेनची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना देण्यात येतील.
- श्रीनिवास कंदुल, विद्युत विभाग प्रमुख, पुणे महापालिका