पुणे - ज्येष्ठ लेखक, विश्वकर्मा प्रकाशनाचे संपादक मनोहर सोनवणे यांचे आज पहाटे हदयविकाराने निधन झाले. सोनवणे हे लेखक, कवी, पत्रकार – संपादक अशा विविध भूमिकांमध्ये चार दशकांपासून सक्रिय होते. त्यांनी संपादनक्षेत्रात भरीव कार्य केले आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेचे ते विद्यमान संपादक होते.
‘एक शहर सुनसान’ (कवितासंग्रह), ‘सदरा बदललेली माणसं’ (ललितगद्य) याशिवाय ‘लोकशाही झिंदाबाद’ (ऑक्सफर्ड प्रेसच्या ‘The Story of Democracy in South Asia’ या अभ्यासग्रंथाचा अनुवाद), ‘शोध नेहरूंचा व भारताचाही’ (शशी थरूर लिखित ‘Nehru The Invention of India’ या पुस्तकाचा अनुवाद), ‘बियॉन्ड 2020’ (डॉ. अब्दुल कलाम यांच्या ग्रंथाचा अनुवाद), ‘वर्तमानात वर्धमान’ (अनुवाद) आदी ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यांच्या साहित्यिक, तसेच संपादकीय कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. अनुभव या मासिकामध्येही त्यांनी अनेक वर्षं काम केले होते. गेल्या वर्षी जालियनवाला बाग या विषयावरील पुस्तक प्रकाशित झाले होते. तर आता दोन तीन महिन्यांपुर्वीच विश्वकर्मा प्रकाशनातर्फे नुकतेच ब्रॅण्ड फॅक्टरी हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला होता.