सावंतवाडी : पुण्याहून गोव्याला बाईक रायर्डसच्या वार्षिक संमेलनासाठी जाणाऱ्या आनंद पांडुरंग पवार (वय ४५, रा. हावेली, जि. पुणे) या रायडर्सच्या दुचाकीला आंबोली घाटात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सावंतवाडी-आंबोली मार्गावरील मुख्य धबधब्याजवळ आॅईल पडले होते. त्यात पवार यांची दुचाकी घसरली आणि हा अपघात घडला.गोवा येथील बागा बीचवर देशातील बाईक रायडर्सचे वार्षिक संमेलन भरते. हे संमेलन यावर्षी गुरुवारपासून सुरू झाले आहे. ते पुढील दोन दिवस चालणार आहे. यासाठी मुंबई, पुणे, सातारा येथील रायडर्स गुरुवारी सकाळपासूनच गोव्याकडे जात होते. आनंद पवार हे स्वत: या संमेलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून दुचाकीने निघाले होते. तर त्यांची पत्नी मागे कारमध्ये होती.आनंद पवार यांची दुचाकी दुपारी १ वा.च्या सुमारास आंबोली येथे आली असता मुख्य धबधब्याजवळ एका वळणावर आॅईल पडले होते. या आॅईलमध्ये त्यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्यात असलेल्या हेल्मेटचेही दोन तुकडे झाले. पवार यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. लागलीच त्यांना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने लागलीच त्याना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.दरम्यान, या घटनेनंतर आंबोली येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सांयकाळी उशिरा आनंद पवार यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची माहिती सुश्रूत थट्टे यांनी पोलिसांना दिली. अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत.(प्रतिनिधी)पत्नी बेशुद्धआनंद पवार दरवर्षी बाईक रायडर्सच्या वार्षिक संमेलनासाठी ते गोव्याकडे जात होते. पवार यांच्या पाठोपाठ एका कारमध्ये त्यांची पत्नीही होती. पत्नीने हा प्रकार पाहिला आणि ती बेशुद्ध पडली. तिच्यावरही येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील तरुणाचा अपघातात मृत्यू
By admin | Published: February 16, 2017 11:06 PM