भोर: पुण्यातील धनकवडीतील एका तरुणाने नीरादेवघर धरणात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर रात्री ११ वाजता धरणाच्या पाण्यात मृतदेह सापडला. श्रीकांत विलास देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत देशमुख पुण्यातून १२ वाजता निघाला होता. भोर-महाड रस्त्यावरील वारवंड गावाजवळ असलेल्या दर्यापुलाजवळचे लोकेशन त्याने त्याच्या बायकोला पाठवून या ठिकाणी आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठवला होता. त्यानंतर देशमुख यांच्या बायकोने ११२ वर फोन करून सदरची महिती भोर पोलिसांना दिली होती. त्यानंतर ३ वाजता पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अजय साळुंके, यशवंत शिंदे, सोनाली इंगुळकर, सागर झेंडे व पोलिस पाटील सुधीर दिघे यांनी भोर-महाड रस्त्यावरील दर्यापुलापासून शोध सुरू केला. साधारण पाच किलोमीटरवर वारवंड हद्दीतील देवराठी येथील पुलाजवळ देशमुख यांची कार (क्र एमएच १२ आर.वाय ४२८६) आढळून आली.
भोर पोलिसांना भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन या रेस्क्यू टीमला बोलावून भोर-महाड रस्त्यावरील वारवंड हद्दीतील देवराठी येथील पुलाजवळ धरणाच्या पाण्यात ५ वाजता शोध सुरू केला. अंधाराने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. अखेर तब्बल पाच तासांनंतर रात्री ११ वाजता मृतदेह सापडला. नवरा- बायकोची भांडणे किंवा घरगुती कारणास्तव आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.