लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: व्यवसायातील पैसे न दिल्याने आर्थिक तंगीतून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तसा व्हॉटसअपवर मेसेज त्याने टाकला. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना एकाने त्यांना हा मेसेज दाखविला. त्यांनी तातडीने पोलिस आयुक्त रितेशकुमार यांना ते कळविले. त्यानंतर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी या तरुणाला शोधून काढून त्याचे समुपदेशन केले आणि प्राण वाचविले. सोमवारी ही घटना घडली.
दत्तवाडीमधील लक्ष्मीनगर परिसरात एक ३२ वर्षाचा तरुण राहतो. त्याचा इंटेरियर डिझाईनचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे काम तो कमिशन तत्वावर करतो. त्यात त्याने ज्यांना साहित्य पुरविले, त्यांनी पैसे दिले नाही. ते पैसे देण्यासाठी त्याने दुसऱ्याकडून पैसे घेतले होते. मालाची उधारीही झाल्याने अनेकांनी पैशांसाठी तगादा लावला होता. उधारी १ कोटींच्यावर गेली. त्यातून एकाने पोलिसांमध्ये तक्रार करतो, असे सांगितले. त्यामुळे आजवर प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या तरुणाने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. तसा मेसेज त्याने तयार करुन मित्रांना पाठविला.
फडणवीसांपर्यंत मेसेज पोहोचला अन्...
हा मेसेज एकाने गृहमंत्री फडणवीस यांना दाखविला. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिस आयुक्तांना दिली. त्यानंतर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्या तरुणाच्या घराचा पत्ता शोधला. दत्तवाडी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्या अडचणी समजावून घेतल्या. त्याचे समुपदेशन केले. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून समजावून सांगितले.
गृहमंत्र्यांनी आम्हाला एका तरुणाच्या संदर्भात मेसेज पाठविला होता. तो नैराश्यातून आत्महत्येच्या विचारात असल्याचे समजले. तत्काळ गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी त्याला शोधून त्याची आस्थेवाईक चौकशी करत समुपदेशन केले. त्याच्या मनातून आत्महत्येचा विचार काढून टाकण्यात आला. -रितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर