पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:15 PM2021-07-13T12:15:30+5:302021-07-13T16:36:38+5:30
मृत्यू झालेल्यांमध्ये कदमवाकवस्तीतील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीचा समावेश
पुणे: बकरी खरेदी करण्यासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या पुणे व कदमवाकवस्ती येथील तरुणांचा रतलाम याठिकाणी दुपारी बारा वाजण्याचा सुमारास भीषण अपघात घडल्याची घटना सोमवारी घडली. या भीषण अपघातात पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, जखमींवर रतलाम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कंटेनर, पिकअप व ट्रॅक्टर अशा तिहेरी वाहनांची धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मोहन साळुंखे (वय-३८) यांच्यासह या अपघातात उमर सय्यद, अली सय्यद (रा. पुणे. वय व पुर्ण पत्ता माहीत नाही) हे तीन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यु झाला. तर राहुल घाडगे, आकाश साळुखे (रा. दोघेही कदमवाकवस्ती ता. हवेली), गुलफाम अन्सारी, नजीर कुरेशी (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे चार जण या अपघातात जखमी झाले. वरील चार जणांपैकी गुलफाम अन्सारी याची प्रकृती चिंताजणक असुन, जखमींच्यावर रतलाम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कदमवाकवस्ती येथील नवनाथ साळुखे, राहुल घाडगे, आकाश साळुंखे व त्यांचे पुण्यातील काही मित्र मागील काही वर्षांपासून मध्यप्रदेशातून बकरी खरेदी करुन, त्याची विक्री पुणे व परीसरात करत होते. रविवारीही ते सर्व बकरी खरेदी करण्यासाठी रतलाम मार्गे पुढे जात होते. रतलाम जवळ रस्त्याचे काम चालु असल्याने, वरील रस्त्यावरील वाहतुक स्थानिक पोलिसांनी एकेरी केलेली आहे.
रतलाम जवळून जात असतांना, अचानक पुढून भरधाव वेगात आलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या छोट्या खड्यात झुकला. हा खड्डा चुकवण्याच्या नादात कंटेनर, थेट पिकअपवर जाऊन आदळला. त्याचवेळी पाठीमागून आलेला ट्रॅक्टरही पाठीमागुन पिकअप येऊन आदळला. यात तीघे जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत.
जखमीपैकी गुलफाम अन्सारी वगळता इतर नजीर कुरेशी, राहुल घाडगे, आकाश साळुखे या तिघांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्याबाबत विचार विनीयमय चालु आहे. गुलफाम अन्सारी यांची प्रकृती मात्र गंभीर असल्याने, त्यांच्यावर रतलाम येथील रुग्नालयातच उपचार सुरु ठेवण्यात येणार आहेत.