जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांसाठीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या निवड प्रक्रियेत भाग घेण्यासाठी कमीत कमी सेवा १० वर्षे असणे गरजेचे आहेच, शिवाय सध्याच्या शाळेवर कमीत कमी २ वर्षे सेवा झालेली असावी, असे सांगण्यात आले आहे .एका शिक्षकाने सदरची लिंक जास्त वेळा भरली तर त्यांचा फॉर्म बाद होणार आहे. शिवाय एखाद्या शिक्षकावर विभागीय चौकशी, शास्ती किंवा पोलीस कारवाई झाली असेल त्यांना मात्र लिंक भरण्यास प्रबंध घालण्यात आले आहेत. शिवाय, टाईमपास म्हणून लिंक भरल्यास सदर शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल अशा सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.
सर्व सूचनांचे पालन करून शिक्षकांनी फॉर्म भरले आहेत. मात्र, शिक्षक दिन होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने नेमके पुरस्कार कधी होतील? याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसरीकडे वर्षभर प्रामाणिक कष्ट करून मुले जिल्हा गुणवत्ता यादीत आणणाऱ्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांना देखील पुरस्काराची प्रतीक्षा लागली आहे. उन्हाळ्यात बदल्या झाल्यानंतर शिक्षकांची शाळा बदल होणार असल्याने लवकर संबंधित पुरस्कार द्यावेत अशी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांची भावना बनली आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल देखील शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद आयोजित करेल या आशेवर जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत.
कोरोनाच्या नियमांचे पालन करून कमी गर्दी करून उपस्थितीबाबत बंधने घालून याच महिन्यात शिक्षकदिनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने करावा व खंड पडू न देता शाळांनाही अध्यक्ष चषक देऊन गौरविण्यात यावे, अशी भावना शिक्षकांमध्ये आहे.
"जिल्हा परिषद सदस्यांचे कार्यकाळाचे हे अंतिम पाचवे वर्ष असल्याने नक्कीच या वर्षी शिक्षक पुरस्कार,अध्यक्ष चषक पुरस्कार देऊन गौरव कार्यक्रम होईल. उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांना शिक्षकांच्या बाबतीत सहानुभूती असल्याने शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा ही त्यांचीही भूमिका राहील .शिक्षण समितीशी चर्चा करून लवकरच तारीख जाहीर केली जाईल."
आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्या, पुणे
================================