पुणे: पुणे शहर व टपाल विभागाचा वाढता व्याप पाहता पश्चिम विभागातर्फे नवीन ठिकाणी टपाल कार्यालये होणार आहेत. त्यामध्ये बावधन, आंबेगाव, सहकारनगर, शिवाजीनगर कोर्ट, शिवणे आदी भागांचा समावेश आहे. पुढील वर्षी ही कार्यालये सुरू होतील, अशी माहिती पुणे शहर पश्चिम विभाग टपालाच्या प्रवराधिक्षक श्रीमती रिपन ड्यूलेट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय डाक सप्ताह निमित्त पुणे शहर टपाल, पश्चिम विभागातर्फे (लोकमान्य नगर) विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासंदर्भात पोस्टाच्या सर्व सेविंग स्किम, इंडियन पोस्टल पेमेंट बँक, आदी सर्व सुविधांची माहिती देण्यात आली. रिपन म्हणाल्या, सप्ताहानिमित्त ‘एक पेड मां के नाम’ ही योजना आम्ही राबविली. त्यात वृक्षारोपण केले. त्यानंतर अनेक ठिकाणी आधार काढण्यासाठी शिबिरे आयोजित केली. गुंतवणूक वाढविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे झाली. टपालाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून ‘डाक चौपाल स्किम’ सुरू केली होती. कार्यालयाबाहेर जाऊन त्याची माहिती दिली. पार्सल सेवेसाठी दोन नवीन सेंटर बावधन, पर्वती येथे उघडणार आहोत.’’
दिवाळी फराळ परदेशातील प्रियजणांना पाठविण्यासाठी खास सेवा उपलब्ध आहे. पुणेकर १३० देशामध्ये फराळ पाठवू शकतील. इतर कुरीअर कंपन्यांपेक्षा आम्ही कमी दरात ही सेवा देत आहोत. गतवर्षी आमच्या विभागाला फराळ पार्सलमधून ५० लाख रूपये उत्पन्न मिळाले होते. यंदा १ कोटी रूपयांचे ध्येय आहे. - रिपन ड्यूलेट, प्रवराधिक्षक, पुणे शहर पश्चिम विभाग टपाल (लोकमान्यनगर)