पुणे : शहरात निर्माण होणारे सांडपाणी मुंढवा येथे बंधारा बांधून जॅकवेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. त्या बदल्यात महापालिकेस पाटबंधारे विभागाकडून साडेसहा टीएमसी जादा पाणी देण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामागील शुक्लकाष्ठ अद्यापही सुरूच असून आधी रेल्वेने, नंतर पाटबंधारे विभागाचे काम रखडल्याने, तर आता एक शेतकरी न्यायायलात गेल्याने हा प्रकल्प आणखी काही महिने रखडणार आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन महिने हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता मावळल्याने किमान या उन्हाळ्यात तरी पुणेकरांना हे साडेसहा टीएमसी जादा पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खडकवासला प्रकल्पातून जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. तब्बल १00 कोटी खर्चून उभारलेला प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण होणार होता. त्यानुसार, एक एप्रिलला पहिले पाणी देण्याच्या घोषणाही झाल्या होत्या. मात्र, हे कामच अद्याप अपूर्ण आहे.