पुणे : मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील परंपरांचा आवर्जून उल्लेख करीत काळ्या पैशांवर टीका करतानाच पुण्याला कॅशलेस सिटी होण्याचे आवाहन केले. प्रश्नांच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी ‘हो, आम्ही होऊ कॅशलेस,’ असे उत्तरच पुणेकरांकडून वदवून घेतले. मोबाईलचे फ्लॅश उडवून पुणेकरांनी पाठिंंबाही दिला. पुणे हे एक विशेष शहर आहे. विद्येचे माहेरघर आहे. एक उद्योगनगरीही आहे. काशीत जसे विद्वान होते तसे पुण्यातही आहेत, असा पुण्याचा गौरव करून मोदी यांनी नंतर आपल्या भाषणातून श्रोत्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली. ‘असे पुणे कॅशलेस होण्यात आपल्याला पाठिंबा देणार की नाही,’ अशी विचारणा त्यांनी केली. श्रोत्यांमधून ‘हो’ असे उत्तर येताच त्यांनी ‘मग मोबाईलचा फ्लॅश सुरू करून मला तसे सांगा,’ असे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणात बोलताना मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी श्रोत्यांना असेच मोबाईलचा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले होते. त्यालाही जोराचा प्रतिसाद मिळाला होता. मोदी यांच्या या आवाहनानंतर लगेचच हजारो श्रोत्यांनी आपल्या मोबाईलचा फ्लॅश सुरू केला. त्याचवेळी दिव्यांचा उजेड कमी करण्यात आला. त्यामुळे चमकणाऱ्या मोबाईलच्या उजेडात श्रोत्यांनी ‘मोदी, मोदी’ असा जयघोष केला. त्यामुळे सुखावलेल्या मोदी यांनी श्रोत्यांना पुन्हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. काळा पैसा साठविणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी असा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट करून मोदी यांनी ‘मेरे पुणेवासी’ अशी खास त्यांच्या शैलीत श्रोत्यांना हाक दिली. त्यालाही श्रोत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. ‘तुम्ही आता आॅनलाइन पेमेंट करणार की नाही,’ असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याला श्रोत्यांमधून ‘हो’ असे उत्तर मिळाले. लगेचच त्यांनी ‘मोबाईल बँकिंग करणार की नाही,’ अशी विचारणा केली. त्यालाही श्रोत्यांनी हो असा जोरदार प्रतिसाद दिला. ‘तुमच्या हातातील मोबाईलचा बँक म्हणून वापर करणार का,’ असेही त्यांनी विचारले. त्यालाही श्रोत्यांनी उत्तर दिले. इ-वॉलेट, इ-पेमेंट, डेबिट कार्ड अशी सर्व व्यवस्था झाली असल्याचे मोदी यांनी सांगितले. आधार कार्डचा वापर करता येईल. फक्त अंगठा मारला की पेमेंट होईल, असे ते म्हणाले. ‘लोकमत’च्या व्यासपीठावरील आश्वासन पाळलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी विविध प्रकल्प अणण्यासाठी केंद्रीय भपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मदत केल्याचा उल्लेख केल. ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात गडकरी यांच्या उपस्थितीत आयोजित एका सोहळ्यात लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी पुणेकरांच्या वतीने विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये पुण्यासाठी विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच लोहगाव विमानतळाची क्षमता वाढ, रस्ते आदींचा समावेश होता. याच वेळी गडकरी यांनी हे सगळे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे दिल्ली आणि मुंबईमध्ये गडकरी यांच्या पुढाकाराने अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये पुण्यातील वाहतूक प्रश्नासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला.
पुणेकरांनी व्हावे कॅशलेस
By admin | Published: December 25, 2016 4:53 AM