पुणे : पुण्याची एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या बसेस सातत्याने रस्त्यातच रुसुन बसत असल्याने, या रुसण्याला अाता पुणेकर पुरते वैतागले अाहेत. पीएमपीकडून मिळालेल्या अाकडेवारीनुसार जानेवारी ते जून या कालावधीत दिवसाला सरासरी दिडशेहून अधिक बसेस मार्गावर बंद पडल्या अाहेत. तर 14 जुलै ते 18 जुलै या कालावधीत तब्बल 197 बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. सातत्याने मार्गावर बसेस बंद पडत असल्याने त्याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे हे चित्र सुधारणार का, असा प्रश्न अाता पुणेकर विचारत अाहेत.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर नेहमीच अाेरड हाेत असते. दरराेज साधारण 10 लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करीत असतात. पीएमपीचे तिकीट इतर शहरांच्या तुलनेने अधिक अाहे. परंतु प्रवाशांना ज्या सुविधा मिळणे अावश्यक अाहे, त्या मिळत नसल्याचे चित्र अाहे. सातत्याने मार्गावर बंद पडणाऱ्या बसेस, त्यांची झालेली दुरावस्था, कर्मचाऱ्यांची अरेरावी या सर्व प्रकारांमुळे पुणेकर या एकमेव सेवेलाही वैतागले अाहेत. पीएमपीकडूनच मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यात पीएमपीच्या मालकीच्या व कंत्राटदारांच्या अश्या दाेन्ही मिळून प्रतिदिन सरासरी 161 बसेस मार्गावर बंद पडल्या अाहेत. तर गेल्या साेमवारी 140, मंगळवारी 141 तर बुधवारी 150 बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. पीएमपीच्या व कंत्राटदारांच्या दरराेज 1480 बसेस मार्गावर साेडल्या जातात. त्यापैकी दिडशेहून अधिक बसेस सध्या बंद पडत अाहेत.
याविषयी बाेलताना पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे म्हणाल्या, बसेसची देखभाल हाेऊ न शकल्याने बसेस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले अाहे. तसेच पावसामुळेही अनेक बसेस बंद पडत अाहेत. ज्या खासगी कंत्राटदारांच्या बसेस बंद पडत अाहेत, त्यांना बसेसच्या देखभालीकडे लक्ष देण्यास सांगितले अाहे. तसेच या संदर्भात एक बैठक झाली असून लवकरच यावर ताेडगा काढण्यात येत अाहे.