अतुल चिंचली
लोकमत न्यूज नटेवर्क
पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. हेल्मेटसक्तीचा नियमही लागू आहे. मात्र मास्कसक्तीचा नियम पाळत असताना याकडे अनेक दुचाकीचालकांचे दुर्लक्ष झाले आहे. हेल्मेट नसल्याने गेल्या दहा दिवसांत तीन कोटी रुपयांची दंडवसुली शहरात झाली आहे.
शहरात सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघे फिरणे, आरसा नसणे, गाडीवर अवजड सामान घेऊन जाणे, नंबरप्लेट, हॉर्न अशा विविध कारणांसाठी पोलिसांकडून रस्त्यावर कारवाई केली जाते. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे.
हेल्मेटबाबतची सर्वात जास्त कारवाई सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून होत आहे. गेल्या दहा दिवसांत म्हणजेच १४ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ७१ हजार ४७३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३ कोटी ५७ लाख ३६ हजार ५०० दंड आकारण्यात आला आहे. सद्यस्थितीत नागरिक हेल्मेट न घालता वाहन चालवत आहेत. कॅमेऱ्यातून होणारी अदृश्य कारवाई त्यांच्या निदर्शनास आली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या नागरिकांना कोणत्याही क्षणी रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडल्यावर पकडले जाते. त्या वेळी गाडीच्या नंबरवरून ऑनलाईन नोंदला गेलेला दंड दाखवला जातो. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही नागरिकांशी संवाद साधला असता एका दुचाकीवरच १५००, ३०००, ४५००, ६०००, ३५०० असा विनाहेल्मेट दंड आकारल्याचे सांगण्यात आले.
चौकट
हेल्मेट डोक्यावर का नसते?
हेल्मेटसक्ती असतानाही त्याचा वापर का केला जात नाही, या संदर्भात नागरिकांकडून पुढील उत्तरे मिळाली -
१) मी हेल्मेट वापरत नाही. कारण मी शहरातल्या शहरातच फिरतो.
२) माझ्या गाडीचा वेग ४० पेक्षा कमी असतो. त्यामुळे हेल्मेटची गरज वाटत नाही.
३) हेल्मेटमुळे डोक्यात कोंडा आणि मानदुखीचा त्रास होतो.
४) हेल्मेटमुळे डोक्याचे केस गळू लागतात.
५) मी लांबच्या प्रवासाला फक्त हेल्मेट वापरतो. शहरात गरज वाटत नाही.
चौकट
“हेल्मेट नसल्याने माझा जवळचा मित्र अपघातात गेला. त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. हेल्मेट जवळ बाळगण्यासाठी थोडी गैरसोय होते, पण जिवासाठी तेवढे करण्यास मी तयार आहे.”
-अच्युत निफाडकर
चौकट
दंडासाठी नव्हे स्वत:साठी
“शहरात मागच्या वर्षी अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दुचाकीवरून झालेल्या ८० नागरिकांपैकी ७३ नागरिकांनी हेल्मेट घातले नव्हते. वाहतुकीच्या नियमानुसार हेल्मेट गरजेचे आहे. नागरिकांनी दंडासाठी नव्हे तर स्वरक्षणासाठी हेल्मेट घालावे.”
-राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे