पुणे : ‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या तिरकस, खवचट, आणि अहंकारी वृत्तीचेच जणू द्योतक ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणा-या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणांमधून प्रत्येकाच्या ओठांवर हास्याच्या लकेरी उमटत होत्या. निमित्त होते, यशवंतराव चव्हाण कलादालनात लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाचे. ’पुणेरी पाट्या’ म्हणजे काय तर पुण्याच्या अभिमानाचा मानबिंदू. जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे पण कुणालाही न दुखावता मांडणे हे ’ पुणेरी पाट्या’ च्या शैलीचे खास वैशिष्ट्य. प्रदर्शनात सायंकाळनंतरही रसिकांचा गर्दीचा ओघ सुरूच होता. उद्या ( रविवारी) देखील हे प्रदर्शन विनामूल्य सकाळी 11 ते 8 या वेळेत पाहाण्यासाठी खुले राहाणार आहे.आवर्जून या!...पुणेकरांचे स्वागत आहे.
‘अरे ही पाटी बघ ना, काय सॉलिड आहे रे’...ही पाटी कुठेतरी वाचली आहे’... ‘खरच हं पुणेकर असेच असतात’...अशा संवादामधून तर काहीशा शालजोडीमधल्या मारातून पुणेकर रसिक ’पुणेरी पाट्यां’ चा मनमुराद आनंद घेत होते..तर काही ज्येष्ठ मंडळी या पाट्या वाचून जुन्या ‘पुणे 30’ च्या आठवणीत हरवले होते..आजवर सोशल मीडियावर नुसत्याच पुणेरी पाट्या किंवा त्यासंबंधीचे विनोद व्हायरल केले जायचे...पण ‘पुणेरी पाट्यां’चा एकत्रितपणे आस्वाद घ्यायला मिळाल्यामुळे पुणेकरही या ’पुणेरी पाट्या’च्या विश्वात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पाट्यांमधून ‘अस्सल’ पुणेरीपणाचा अनुभव रसिकांना मिळाला.
’ दाराची बेल वाजविल्यावर दार उघडायला वेळ लागतोच, घरात माणसे राहातात स्पायडरमन नाही’, ’चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’ अशा नर्मविनोदी पाट्यांमधून पुणेकर रसिक खळखळून हसत होते. या पुणेरी पाट्या आता फारशा पाहायला मिळत नसल्यामुळे त्या संग्रही ठेवण्यासाठी काही पाट्या रसिक कँमे-यात बंदिस्त करीत होते. कुणी या प्रदर्शनात पाट्यांसमवेत सेल्फी काढताना दिसत होते...ज्येष्ठांसह तरूणाई देखील पाट्यांच्या विश्वात हरवली होती.
‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाला रसिकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला. या पाट्या लिहिण्याची एक वेगळी शैली असल्याने पुणेकर रसिकांनाही एका वॉलवर ‘पुणेरी पाटी’ लिहिण़्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.त्यालाही रसिकांनी उचलून धरले...शब्दांच्या गुंफणीतून ‘पुणेरी पाट्या’ लिहिण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता. आमदार मेधा कुलकर्णी यांनाही ‘पुणेरी पाटी’ वर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ’भाजपालाच मत द्या, दुस-या कुणाला नको’.इच्छेवरून फडके...अशी पाटी त्यांनी वॉलवर लिहिली. प्रदर्शनात सायंकाळनंतरही रसिकांचा गर्दीचा ओघ सुरूच होता. उद्या ( रविवारी) देखील हे प्रदर्शन विनामूल्य सकाळी 11 ते 8 या वेळेत पाहाण्यासाठी खुले राहाणार आहे.आवर्जून या!...पुणेकरांचे स्वागत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा : https://www.facebook.com/lokmat/videos/1806704849396034/